कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन दिवाळीत ऊसदर आंदोलनाचा भडका उडालेला आहे. उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलथवून टाकण्याचा प्रकार टाकळीवाडी येथे घडला आहे. तर काल रात्री वारणा साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. राजू शेट्टी यांना राजकीय आव्हान मिळू लागले असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

वारणा कारखान्याची वाहतूक का रोखली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केल्याने काल रात्री या कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. रात्री वारणा सहकारी साखर कारखान्याचा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात लोकांनी पेटविला. ही घटना वठार – पारगाव रस्त्यावरील चावरे फाट्याजवळ घडली आहे. शासन व कारखानदार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू लागल्याने लोकांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा : राजू शेट्टी तुमच्या दूध संघाचा दर वाढवा; कोणतीच निवडणूक लढवणार नाही- राहुल आवाडे यांचे प्रतिआव्हान

शिरोळ पेटले

आज सकाळी शिरोळ तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये उसाच्या गाड्या रोखण्यात आल्या. चाकातील हवा सोडून देण्यात आली. टाकळीवाडी या गावात तर आंदोलनाचा भडका उडाला. येथील काही शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देण्यात आम्हाला रोखू नका, असे म्हटले होते. त्याला शेतकरी संघटनांनी आज आव्हान दिले. टाकळीवाडी येथे साखर कारखान्याजवळ असलेल्या उसाच्या फडात जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलक अंकुश यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली. यावेळी साखर कारखानदार समर्थकांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला.

हेही वाचा : मला मुख्यमंत्री करा; सर्व प्रश्न सुटतील, संभाजीराजेंचा पुनरुच्चार

संतप्त आंदोलकांनी ऊसाच्या गाड्या उलथवून टाकल्या. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साखर कारखाने तसेच परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader