कोल्हापूर : निवडणूक कामाच्या ठिकाणी गैरहजर असल्याच्या कारणावरून एका तलाठ्याचे निलंबन नाट्य रविवारी कोल्हापुरात चांगलेच रंगले. याच कारणातून वळीवडे (तालुका करवीर) येथील तलाठ्यास दुपारी निलंबित करण्यात आले. आणि सायंकाळी आदेशपत्र मागे घेण्याचा किमयाही घडली. निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रशासकीय काम असल्याचे सांगून कानावर हात ठेवले.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रशासन पातळीवर गतिमान झाली आहे. या अंतर्गत केंद्रनिहाय मतदान यंत्र तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे काम व्ही. टी. पाटील भवनात सुरु होते. मतदान यंत्र हा विषय संवेदनशील असल्याने कामाच्या ठिकाणापासून कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यास बाजूला जात येत नाही.
वळीवडे येथील तलाठी प्रवीण शेजवळ हे नेमून दिलेले कामकाज पूर्ण होईपर्यंत हजर राहणे आवश्यक असताना होते. पण ते कामाच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी प्रवीण शेजवळ यास निलंबित करणारा आदेश रविवारी दुपारी जारी केला आहे. त्यावर कर्मचारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर सायंकाळी याच अधिकाऱ्याने निलंबन मागे घेण्याचा दुसरा आदेश लागू केला.
हेही वाचा…चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन दुर्गम वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत
खुमासदार चर्चा
या निलंबन नाट्याची शासकीय कर्मचार्यांमध्ये खुमासदार चर्चा होती. त्यावरून टीका करण्यात आली. ‘ निवडणूक कामात हलगर्जीपणा चालत नाही .तथापि संबंधित तलाठी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देवून त्यांना न्याय देणे आवश्यक आहे,’ अशी प्रतिक्रिया जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल लवेकर यांनी व्यक्त केली.