कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराच्या सुमारे एक हजार रुपये खर्चाच्या प्रस्तावित आराखड्यामुळे मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होणार आहे. या आराखड्यामध्ये अनेक दोष आहेत. व्यापाऱ्यांना याआधी कथन केलेले पुनर्वसनाचे मुद्दे प्रस्तावित आराखड्यामध्ये अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे या आराखड्याला व्यापारी वर्गाचा विरोध आहे, अशी माहिती महाद्वार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, भाजपचे माजी नगरसेवक किरण नकाते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते म्हणाले की, गतवर्षी मार्च पासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार या आराखड्यासाठी प्रयत्नशील आहेत. परिसरातील रहिवासी व व्यावसायिक यांच्या समवेत अनेकदा बैठका झाल्या. त्यावेळी सर्वांचा विचार करून सर्व सहमतीने आराखडा अंतिम करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने आम्ही त्यावर विसंबून होतो. तथापि जो आराखडा समोर आला आहे; तो पाहता व्यापारी वर्गावर अन्याय होणार अशी भावना झाल्याने आराखडा राबवण्यास आमचा विरोध राहील.

हेही वाचा : कोल्हापुरात अदानी उद्योग समूहाच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधातील राजकीय धार वाढली

पर्यायाचा शोध घ्यावा

आराखडा तयार करताना देवस्थान समिती अथवा प्रशासनाकडे कोणत्याही स्वरूपाची तपशीलवार माहिती उपलब्ध नव्हती. परिसरातील इमारती वापरातील क्षेत्रफळ, रहिवासी, भाडेकरूची संख्या याची कोणतीच माहिती न घेता आराखडा बनवण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या दोन एकरातील कपिलतीर्थ मार्केट मध्ये पुनर्वसन शक्य असल्याने त्याचा विचार होणे गरजेचे आहे, असे असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत गोयानी यांनी सांगितले.

हजारोंवर गंडांतर

आम्ही केलेल्या सर्वेक्षणामध्ये ५४८ युनिट असून सुमारे साडेतीन लाख चौरस फूट इतका जागेचा वापर होतो. थेट बाधित होणाऱ्यांची संख्या तीन हजारच्या वर असून अवलंबितांची संख्या सुमारे १५ हजार आहे. सर्व या प्रस्तावित आराखड्यामुळे बाधित होणार आहेत. सर्वांचा उदरनिर्वाह मंदिरावर अवलंबून असल्याने या सर्वांना हाकलून लावले. हे इतक्या मोठ्या जनतेवर थेट आघात करण्यासाठी आहे, असे मत भाजपचे माजी नगरसेवक, श्रीपुजक अजित ठाणेकर यांनी नोंदवले.

हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा शिंदे गटाला – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नवा आरखडा करावा

यापुढे कोल्हापुरातील सर्व पालकमंत्री, मंत्री ,खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींना भेटून आमच्या भावना मांडणार आहोत. मंदिर परिसराचा सर्व समावेशक नवा आराखडा तयार केला पाहिजे, अशी मागणी उपाध्यक्ष मनोज बहिरशेठ यांनी केली. यावेळी सचिव गौतम नागपूरकर, प्रशांत मेहता, दीपक हातगिने, विनीत कटके, ज्ञानचंद्र नेनवानी आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur traders oppose proposed development plan of mahalaxmi temple css