कोल्हापूर : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या इंडिया मेकर्स ऍग्रो इंडिया या कंपनीशी संबंधित आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुरेश चापाजी जुन्नरे (वय ६५ राहणार भांडुप पश्चिम आणि कंपनीचे मार्केटिंग कन्सल्टंट श्रीधर हरिश्चंद्र खेडेकर वय ५५ राहणार पुणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. ही माहिती शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेतर्फे देण्यात आली.
आर्थिक परताव्याचे आकर्षक आमिष दाखवून मेकर्स ऍग्रो इंडिया कंपनीने अनेकांना गंडा घातला होता. याचा शोध आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र ,कर्नाटक, गोवा या राज्यांमध्ये केला होता. गुंतवणूकदारांच्या ५६ कोटी ५२ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी मेकर ऍग्रो इंडिया प्रायव्हेटेड ग्रुपच्या २३ संचालक एजंट विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य सूत्रधार रमेश महादेव वळसे पाटील, त्याच्या पत्नीसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा…एकीकडे उमेदवारी अर्जाची तयारी दुसरीकडे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड; राजू शेट्टी पेचात
तर आता याप्रकरणी नव्याने आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके पुणे पालघर येथे रवाना झाली आहेत. आज अखेर या कंपनीची दोन कोटी ३५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता व दोन लाख दहा हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत , असे आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी सांगितले.