कोल्हापूर : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मद्यपी तरुणाने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना कुडित्रे ( ता. करवीर ) येथे रविवारी घडली. जंबा भगवंत साठे (वय ६५) असे मृताचे नाव आहे. संशयित हल्लेखोर रतन बाळासाहेब भास्कर (रा. कुडित्रे) हा एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन पळून गेला. दरम्यान, खुन्याला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने गावात तणाव निर्माण झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी नातेवाईकांची समजूत काढली. या वादात मृतदेह तीन तास जागेवरच होता. कुडित्रे गावातील चौकामध्ये काही लोकांशी साठे हे बोलत होते. तेव्हा तेथे बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेला मद्यपी रतन भास्कर हा आला. त्याने काही कारण नसताना साठे यांना हातातील दंडुकाने मारहाण सुरू केली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन पळून गेला.

हेही वाचा : शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेवरून कोल्हापुरातील पद्माराजे हायस्कूलमध्ये संयोजक – पालकांमध्ये वाद

इचलकरंजीत तरुणाचा निर्घृण खून; ओळख लपवण्याचा प्रयत्न

इचलकरंजी येथे एका स्मशानभूमीमध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. प्रशांत भैरू कुराडे (वय २५, रा.इंदिरानगर ) असे मृताचे नाव आहे. तो एका प्रोसेस मध्ये काम करतो. खून केल्यावर मृतदेह लपवण्याचा प्रयत्न झाला. दगडाने ठेचून पुन्हा मृतदेहावर मोठमोठे दगड, सिमेंटचे तुकडे ठेवण्यात आले होते. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम गावभाग पोलिसांकडून सुरू आहे. खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शांतीनगर परिसरात कत्तलखान्याजवळ कोल्हाटी डोंबारी समाजाची स्मशानभूमी आहे. यामध्ये एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्यावर गावभागचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथकाने धाव घेतली. दगड, सिमेंट काँक्रीटच्या तुकड्यांनी डोके ठेचूने निर्घृण खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. मृतदेह लपवण्यासाठी त्यावर मोठे दगड, सिमेंटचे तुकडे, खांब यांचा थरच टाकण्यात आला होता. खून कोणत्या कारणातून झाला याची स्पष्टता होऊ शकलेली नाही.

हेही वाचा : कोल्हापूर : चंदगडमध्ये भाजपचा अजितदादा गटाला शह; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणातून राजकीय नाट्य रंगले

पोलिसांसमोर रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान होते. मात्र काही तासांतच मृताची ओळख पटली. प्रशांत कुराडे असे त्याचे नाव आहे. त्याच्या बहिणीने मृतदेह ओळखला. याची माहिती गावभाग पोलिसांनी दिली. घटनास्थळी उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले असून ते जप्त करण्यात आले आले. इंदिरा गांधी रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur two murders one at ichalkaranji and another in kuditre css