कोल्हापूर : लहान मुले पळवून नेत असल्याच्या गैरसमजुतीतून दोघा भिक्षेकर्यांना शनिवारी येथे जमावाने बेदम मारहाण केली. हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. राजारामपुरीतील १३ वर्षीय मुलगा दुपारी लॉ कॉलेज चौकात आपल्या मित्राच्या दुकानात बसला होता. यावेळी भगवी वस्त्र परिधान केलेले दोन भिक्षेकरी चालले होते. या परिसरातील रिक्षाचालकास ते मुलांना पळवून नेत असल्याचा संशय आला. यातून त्यांनी आरडाओरड केल्यानंतर मोठा जमाव जमला.
हेही वाचा : कोल्हापूर: उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा के. पी. पाटील यांना धक्का; ‘बिद्री’ कारखान्याचे लेखापरिक्षण होणारच
त्यांनी भिक्षेकर्यांना मारहाण केली. पोलिसांनी संशयित दोन भिक्षेकर्यांना पोलीस ठाण्यात आणले. समीर जोगी आणि सोहेल जोगी अशी त्या दोघांची नावे असून आपण मूळचे उत्तर प्रदेशचे असून कोल्हापुरात येऊन भिक्षा गोळा करून उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली यामध्ये काही आक्षेपार्ह आढळून आले नाही.