कोल्हापूर : ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या विक्रम भावे लिखित पुस्तकाचे प्रकाशन येथे पार पडले. यावेळी भावे यांनी या हत्या प्रकरणातील माझी अटक, खोटे आरोप आणि अखेर निर्दोष मुक्तता यावर भाष्य केले. खोटे कथानक उभे करून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले, असे भावनिक उद्गार काढले. व्यासपीठावर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट उपस्थित होते.
हिंदुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला. हिंदू धर्मासाठी लढणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे संजीव पुनाळेकर यांनी स्पष्ट केले. या प्रकाशन सोहळ्याला कोल्हापूर आणि परिसरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी खंबीरपणे – पुनाळेकर
अन्वेषण करणाऱ्या यंत्रणांकडून हिंदू विधीज्ञ परिषद, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीसह इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अतिरेकी संघटना म्हणण्याची समाजात प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. आझाद मैदानावरील दंगलीची नुकसानभरपाई, तसेच अनेक शेतकरी, प्लॉटधारक यांच्या लुबाडून घेतलेल्या भूमी हिंदू विधीज्ञ परिषदेने त्यांना परत मिळवून दिल्या आहेत. जो जो हिंदू धर्म आणि कार्य यांसाठी लढतो त्यासाठी आम्ही सतत लढत राहणार आहोत.
खोट्या अधिकाऱ्यांना शिक्षा कधी? – सुनील घनवट
हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली, मात्र ज्यांनी त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले, त्या अधिकाऱ्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. ते आजही लाखो रुपयांची पेन्शन घेऊन सुखात आहेत, ही न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे.’
“हिंदुत्वासाठी कारावास – रावसाहेब देसाई
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई म्हणाले, ‘ज्यांनी हिंदुत्वासाठी अन्याय सहन केला, त्यांच्या संघर्षाची दखल घेणे आपले कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करत राहा.’