कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस पावसाची उघडझाप सुरू होती . पण शनिवारी पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे . कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांशी सर्व भागात आज मुसळधार पाऊस झाला. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मध्यरात्रीपासून दीड फूट वाढ झाली आहे.
जिल्ह्यात गेले तीन-चार दिवस पावसाचे प्रमाण कमी होते. तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी तीस फुटाहून अधिक वाढली होती. ती इशारा पातळीकडे जाण्याची चिन्हे दिसत होती त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले.
हेही वाचा : कोल्हापूर: गांधीनगरात एकल प्लास्टिकचा सर्वात मोठा साठा जप्त
पंचगंगा नदीची पाणी पातळीही कमी झाली होती. काल रात्री ती १६ फूट ४ इंच होती. तर पावसाने जोर धरल्याने शनिवारी सायंकाळी ही पातळी दीड फुटाने वाढून १७ फूट ८ इंच इतकी झाली होती. आज १४ बंधारे पाण्याखाली होते. जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत राहिला. पुन्हा एकदा पाऊस जोर धरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसाची गती ही शेतकऱ्यांना सुखावणारी ठरली आहे.
दोन घरांवर दरड कोसळली
राधानगरी तालुक्यातील वाघवडे येथे दोन घरावर दरड कोसळली. यामध्ये ३५ हजाराचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडू लागले आहेत. दिनकर धोंडीबा सावेकर यांच्या घराचे १० हजार रुपयांचे तर संदीप दगडू वरुटे यांच्या घराचे ३५ हजाराचे नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. दोन्ही कुटुंबीयांना नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आले आहे.