कोल्हापूर : राज्य शासनाने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची कागदपत्रे मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. महा-ई-सेवा केंद्र महसूल कार्यालयात महिलांची रांग लागली आहे. कागदपत्राच्या पूर्ततेबाबत शासकीय कार्यालयात समन्वय दिसत नाही. इच्छुक महिलांची वाढती संख्या पाहता दलालांचे फावत असल्याचेही दिसत आहे.
दरमहा १५०० रुपये अनुदान देणारी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी होण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरु झाली असून १५ जुलै पर्यंत अखेरची मुदत आहे. पाहिलीय टप्प्यात लाभार्थी होण्यासाठी महिलांचे कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी महिलांच्या झुंडीच्या झुंडी शासकीय कार्यालयासमोर दिसत आहेत. कागदपत्रांसाठी शासकीय शुल्क जितके आहे त्याच्या कितीतरी पट अधिक रक्कम दलालांकडून आकारणी सुरू केले आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निशुल्क स्वरूपात हे काम केले आहे. राजकीय पक्षांनीही याचा लाभ मिळवून देत मतपेढी भक्कम करण्यावर भर दिला आहे.
हेही वाचा : कोल्हापुरात तरुणाचा खून; दोन हल्लेखोर ताब्यात
समन्वयाची गरज
मात्र, नेमक्या कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी याबाबत महा-ई-सेवा केंद्र – महसूल विभाग यांच्यात समन्वय नाही. महसूल विभागाने ही जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडे बोट दाखवले आहे. यामुळे लाडकी बहीण बनता बनता महिलांची फरफट सुरू झाली आहे.
हेही वाचा : कोल्हापुरातील कात्यायनी मंदिरात पुन्हा चोरी
‘अहों’चीही घाई
उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी इचलकरंजी तहसील कार्यालयातुन सोमवारी ८०० दाखले देण्यात आली तर आज एक हजारावर दाखल्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरून प्रतिसाद दिसत असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाण्याची चिन्हे आहेत. बहिणीच्या बरोबरीने योजनेचा लाभ मिळावा यासाठी पतिदेवाची धावपळ सुरू असल्याचे गमतीशीर चित्र दिसत आहे.