कोल्हापूर : दिवसा उजेडी पहावे तिकडे प्रदूषित, दुर्गंधीयुक्त काळे पाणी आणि दिवस मावळल्यापासून रात्री गर्द अंधार, अशातच मगरी, मोठे मासे अशा जलचरांचा धोका! अशाही संकटाला तो तोंड देत तब्बल पाच दिवस नदीपात्रात होता. शुक्रवारी त्याच्या मदतीच्या ओरडण्याची हाक त्याला वाचवायला गेलेल्या बचाव पथकाला ऐकू आली आणि त्यांच्या मदतीमुळे संदीप प्रथमच जमिनीवर आला. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, असा जीवघेणा प्रसंग होता. शिरढोणच्या बेपत्ता आदित्य मोहन बंडगर याच्या जगण्या मरण्याची काळ जणू परीक्षाच घेत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचे झाले असे की शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील आदित्य बंडगर हा युवक गावातील पंचगंगा नदी पात्रात पोहायला गेला होता. नदीत त्याने सुर मारला. पण पुढे काय झाले त्याला समजलेच नाही. तो नदीपात्रात पुढे जाऊन चिखलाच्या एका भागात अडकून पडला. ते तब्बल पाच दिवस. दरम्यान, त्याचा शोध सुरू राहिला. गेल्या पाच दिवसांपासून बोटीच्या सहाय्याने रोजच त्याचा शोध घेतला जात होता. ड्रोनचा वापर करूनही तो कोठे दिसतो का याचा आदमास घेतला जात होता. काहीच अंदाज येत नव्हता. नदीतील मगरी, मोठे मासे यांमुळे इकडे नागरिकांनी तर्कवितर्क सुरू केले होते.

हेही वाचा : कोल्हापूरच्या आखाड्यात मी कायम; प्रचार सुरूच – डॉ. चेतन नरके

अशातच आज शेवटची संधी म्हणून बचाव पथकाने फेरी मारली. त्यातही निराशा आली आणि पथक परतू लागले होते. इतक्यात वाचवा …वाचवा असा जोरदार आवाज आला. आणि पथकाने पाहिले तो काय आदित्य त्यांच्याकडे मदतीची याचना करत होता. बचाव पथक तत्परतेने त्याच्याकडे धावले. चिखलात अडकलेल्या आदित्यला काढणे हेही एक आव्हानच होते. त्यात बचाव पथक यशस्वी ठरले. चिखलात माखलेल्या आदित्यला स्वच्छ करून उचलून जमिनीवर आणले. त्याची तब्येत बरी नसल्याने त्याला इचलकरंजीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले आहे. शोध मोहीमेस प्रदिप ऐनापुरे, हैदर‌अली मुजावर, नितेश व्हणकोरे, निशांत गोरे यांनी योगदान दिल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. बचाव पथकातील तरुण व्हाईट आर्मी या सेवाभावी आणि आपत्तीवेळी धावून जाणाऱ्या संस्थेचे स्वयंसेवक आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur youth who stuck in the mud of the riverbed rescued after 5 days css