कोल्हापूर : दहा वर्षाच्या कालावधीत भाजपने स्थिर सरकार देऊन देशाची अतुलनीय प्रगती केली आहे. पाच वर्षात देशाला पाच पंतप्रधान देण्याचे स्वप्न काँग्रेस पक्ष पाहत आहे. हा प्रकार देशातील जनता सहन करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे काँग्रेसच्या रणनीतीवर सडकून टीका केली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची येथील तपोवन मैदानामध्ये विराट सभा झाली. यावेळी मोदी यांनी आपल्या कार्यकाळात देशाचा उंचावणारा विकासाचा आलेख मांडताना काँग्रेस, इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यासाठी त्यांनी शेजारच्या कर्नाटक राज्याचा संदर्भ दोन वेळा घेतला.

हेही वाचा…भाजप, मित्र पक्षांचे उमेदवार पराभूत होण्याची लक्षणे दिसू लागल्याने सरकारला कांदा निर्यातीबद्दल जाग; राजू शेट्टी यांची टीका

ते म्हणाले, कर्नाटक राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसने अडीच वर्षांसाठी एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडला आहे. पुढच्या अडीच वर्षांमध्ये त्यामध्ये बदल केला जाणार आहे. झारखंड, राजस्थान राज्यांमध्ये हाच फॉर्मुला वापरला गेला. सत्याची मोडतोड करणाऱ्या काँग्रेसकडे कोणीही सत्ता सोपवणार नाही. कर्नाटक मध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७ टक्के आरक्षण होते. रातोरात त्यामध्ये बदल करून मुस्लिमांना आरक्षण दिले आणि त्यांनीच ते बळकावले.उद्या काँग्रेस सत्तेवर आले तर देशातील आरक्षणाला धोका निर्माण होणार आहे, याची जाणीव ही त्यांनी करून दिली.

अयोध्येमध्ये ५०० वर्षानंतर राम मंदिर बांधण्याचे देशवासीयाचे स्वप्न साकारले. राम मंदिरा विरोधात न्यायालयीन दावा करणारा अन्सारी परिवार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिला. काँग्रेसने मात्र त्याकडे पाठ फिरवली. हाच काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी सनातन धर्माला डेंग्यू ,मलेरिया अशा शब्दांनी हिणवणाऱ्या डीएमके पक्षाच्या सोबतीने बसत आहे. नकली शिवसेना त्यांच्या खांद्याला खांद्या लावून प्रचार करीत असल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील, अशा शब्दात मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

हेही वाचा…सतेज पाटील उमेदवार आहेत का? खासदार संजय मंडलिक यांनी पुन्हा डिवचले

काश्मीर मधील ३७० कलम हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतला. इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर हा निर्णय फिरवण्याचा प्रयत्न करणार आहे. मोदींनी उचललेले हे पाऊल मागे घेण्याची हिंमत विरोधी आघाडीत आहे का, असा तिखट प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला.

हेही वाचा…उपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना जागा दाखवा; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका

मतांच्या पुष्टीकरणासाठी इंडिया आघाडी दलितांचे आरक्षण आणि सर्वसामान्यांचे संपत्ती हिरावण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नाला रोखून धरले पाहिजे. सामान्यांच्या कष्टातील कमाई लुटणाऱ्या या प्रवृत्तीला या निवडणुकीत रोखून लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापुरातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावे. असे आवाहनही मोदी यांनी केले.