लग्नाचे आमिष दाखवून केलेल्या बलात्कारातून जन्माला आलेल्या नवजात बाळाचे पितृत्व नाकारणाऱ्या उच्चभ्रू समाजातील तरुणासह स्वत:ची व नवजात बाळाची डीएनए चाचणी करावी, म्हणून पीडित दलित तरुणीने केलेला अर्ज सोलापूरच्या सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे डीएनए चाचणीतून नवजात बाळाचे पितृत्व सिद्ध होण्यास मदत होणार आहे.
सोलापूर शहरात राहणाऱ्या एका दलित तरुणीबरोबर उच्चभ्रू समाजातील तरुणाची ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यातून त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यातून ती गरोदर झाली. तिने नवजात बाळाला जन्म दिला. परंतु नंतर त्या तरुणाने पीडित तरुणीविषयी आपला ‘रस’ कमी केला आणि गुपचूपपणे दुसऱ्या मुलीबरोबर विवाह ठरविला. हळदकार्याच्या दिवशीच हा प्रकार समजला. आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच पीडित दलित तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनीही या घटनेची दखल घेऊन त्या तरुणाला हळदीच्या अंगानिशी मंगल कार्यालयातून अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याच वेळी धोका देणाऱ्या तरुणाला धडा शिकवावा या हेतूने पीडित तरुणीने स्वत:सह नवजात बाळाची व पितृत्व नाकारणाऱ्या आरोपीची डीएनए चाचणी करावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. या अर्जाला आरोपीचे वकील जयदीप माने यांनी हरकत घेतली. परंतु न्यायालयाने पीडित तरुणीचा अर्ज मंजूर करून तिच्यासह नवजात बाळाचे व आरोपीचे रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्याचा आदेश दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा