कोल्हापूर : कडक उन्हाचा मारा असतानाही सोमवारी संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपल्या ताकतीची चुणूक दाखवली.
महायुतीच्या वतीने कोल्हापूर मतदारसंघात संजय मंडलिक व हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही खासदारांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर गेले पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडला होता. सभा, मेळावे, पदयात्रा यांना जोर आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दमदार शक्तिप्रदर्शन

तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी आज सकाळी गांधी मैदान येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिंदे शिवसेना, अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही उपस्थिती लावली होती. तेथून वाद्याच्या गजरात मिरवणूक निघाली. शिवसेना पुन्हा सत्तेत हे नवे गीत जागोजागी वाजवले जात होते. उन्हाचा पारा तापलेला असतानाही गर्दी झाली होती. भगवे, निळे झेंडे फडकत होते.

हेही वाचा – कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांचे बंड थंड; मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर धैर्यशील मानेंच्या प्रचारात सक्रिय

हेही वाचा – प्रचार लोकसभेचा पण मशागत विधानसभेची

नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी

एकनाथ शिंदे, संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचे कट आउट कार्यकर्त्यांच्या हातात होते. त्यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार धनंजय महाडिक, रामदास कदम, निवेदिता माने, सदाभाऊ खोत, तसेच विनय कोर, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील एड्रावकर, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर आदी आमदार सजवलेल्या ट्रकमध्ये होते. ट्रकसमोर सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे कट आउट लावलेले होते. कार्यकर्ते महायुतीच्या ऐक्याच्या घोषणा देत होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the presence of cm eknath shinde in the hot sun sanjay mandalik and dhairyasheel mane filed their candidature in kolhapur strong performance ssb