प्रसिद्ध गोकूळ दूध अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कोल्हापूरातील मुख्यालयात आयकर विभागाने अचानक धाड टाकली. दरम्यान, या पथकाने संघाची तब्बल ४ तास कसून चौकशी केली. यासाठी काही आवश्यक कागपत्रांची तपासणीही करण्यात आली. कर चुकवल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. मध्यरात्री ही धाड टाकण्यात आली आहे.

गोकूळ दूध संघाची २ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. मात्र, मागील काही महिन्यांत या दूध संघाकडून नेहमीपेक्षा कमी प्रमाणात कर भरणा झाला आहे. सुमारे ५ कोटी रुपयांचा कर गोकूळने चुकवण्यात आल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे.

मात्र, यावर गोकूळच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून गाईच्या दूध दरात घट झाल्याने ९० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे कर भरण्यातही घट झाली आहे. मात्र, गोकूळच्या अधिकाऱ्यांचे हे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळेच दूध संघावर धाड टाकण्यात आली असून यासंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

 

Story img Loader