कोल्हापूर : कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जात वैद्यकीय शिक्षणमंत्रीपद मिळवले असले तरी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी जमवलेला निधी शेल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टिप्पणी सक्तवसुली संचालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने (पीएमएलए) केली आहे, तर दुसरीकडे मुश्रीफ यांचे सनदी लेखापाल महेश गुरव यांचा जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.
या दोन्ही घटनांमुळे मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शासनाला पाठिंबा देणारे खासदार, आमदार, मंत्री यांच्यामागे ससेमिरा सुरू झाला. प्राप्तिकर विभाग, ईडी, नाबार्ड आदी विविध यंत्रणांकडून तपास सुरू झाला. कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचीही सातत्याने चौकशी करण्यात येत होती.
हेही वाचा >>>ऊसाला ५ हजार रुपये दर द्यावा अन्यथा कारखान्यातील अंतराची अट काढावी; शेतकरी संघटनेच्या परिषदेत ठराव
मुश्रीफ यांची कागल, पुणे, मुंबईतील निवासस्थानी ‘ईडी’ने अनेकदा चौकशी केली. ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही दोनदा चौकशी करण्यात आली. एकदा कार्यकारी संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबईत नेऊन चौकशी करण्यात आली. अलीकडे नाबार्डकडूनही चौकशी झाली होती. ही चौकशी मुख्यत्वे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे सुरू होती. त्याचबरोबर मुश्रीफ यांचे कागलमधील प्रतिस्पर्धी भाजपचे स्थानिक नेते समरजितसिंह घाटगे यांनीही मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यात ऊस उत्पादकांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली होती.
हेही वाचा >>>संघर्ष पेटला! इस्रायल आणि हमासमध्ये १ हजारांहून नागरिकांचा मृत्यू; गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरूच
भाजपचे नेते घाटगे यांनीही, मुश्रीफ यांच्या विरोधातील तक्रारीचा पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. सभासदांचा पैसा साखर कारखान्यामध्ये गैर पद्धतीने वापरला गेल्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचा पाठपुरावा पुढेही करणार आहे. न्यायालयाच्या टिप्पणीची कागदपत्रे मिळाल्यावर या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले जाईल, असे घाटगे यांनी रविवारी सांगितले. त्यामुळे एकीकडे तपास यंत्रणांकरवी चौकशी तर दुसरीकडे घाटगे यांच्याकडून चौकशीचा पाठपुरावा याचा सामना हसन मुश्रीफ यांना करावा लागणार असल्याचे दिसते.
चौकशीचे काय?
मुश्रीफ यांनी अजित पवारांना साथ दिल्यानंतर आणि ते मंत्री झाल्यानंतर चौकशीचे शुक्लकाष्ट थांबेल, अशी धारणा होती. तथापि, ईडीच्या विशेष न्यायालयाची टिप्पणी पाहता त्यांची चौकशी पुढेही सुरू राहणार असल्याचे दिसते. सत्तेत सामील झाल्यामुळे मुश्रीफ यांना दिलासा मिळणार का, हा प्रश्न कायम आहे. शनिवारीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुश्रीफ आमच्याबरोबर आले तरी त्यांची चौकशी सुरू राहणार असल्याचे म्हटले होते.