वर्षभरापूर्वी गुन्ह्यांची उकल होण्याचा दर ९ टक्के होता. आधुनिक उपकरणे व साधने उपलब्ध करून दिल्याने हा दर वर्षभरातच ३२ टक्क्यांवर गेला आहे, असे नमूद करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीसाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रणा व सुविधा यांच्यासाठी आपले दोन महिन्यांचे वेतन १ लाख १६ हजार देण्याचे घोषित करतानाच लोकसहभागातून निधी निर्माण व्हावा, यासाठी लोकसहभाग वाढविण्याची जनतेला साद घातली.
इचलकरंजी पोलीस ठाणे, इचलकरंजीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी पाडव्यादिवशी झाले. खासदार राजु शेट्टी यांनी पोलिसांना सुविधाही चांगल्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे सांगून समाजाचे प्रबोधन करून क्राइम रेट कमी करावा, असे सांगितले.
आमदार सुरेश हाळवणकर यांनी नवीन पोलीस ठाण्यांच्या उर्वरित कामांसाठी ६० लाखांचा निधी अद्याप येणे बाकी आहे तो लवकरात लवकर मिळवून द्यावा. पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करून आमदार फंडातून ५ संगणक या पोलीस ठाण्यासाठी देण्याचे जाहीर केले.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी शासकीय बांधकाम या शीर्षांवर निधी वाढवून दिल्यास शासकीय इमारतींवर अधिक निधी खर्च करता येईल, असे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी बंद पडलेले जकात नाके पोलीस चौक्यांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयोग येत्या काळात होणार आहेत, त्यासाठी नगरपालिकेने ठराव पास करून जागा द्याव्यात, असे आवाहन केले. नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पोलिसांना बंद पडलेले जकातनाके पोलीस चौक्यांसाठी देण्यात येतील, असे सांगितले.
प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक नरळे यांनी केले. तर आभार एस.जी.कणसे यांनी मानले. या वेळी जिल्हा सत्र न्यायाधीश राजेश अस्मर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Story img Loader