देशातील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरात ५२ ऐवजी ७२ सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. मंदिरात जाणाऱ्या भाविकांचीही प्रवेशद्वारावर कडक तपासणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तसेच अन्य ठिकाणीही हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. याची दखल घेऊन देशभरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आली असून हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस सतर्क झाले आहेत. महालक्ष्मी मंदिर हे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक महत्वाचे देवस्थान असल्याने येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बॉम्बशोधक पथक, शीघ्रकृती दल, जुना राजवाडा पोलिस महालक्ष्मी मंदिरात दाखल झाले आहेत. शिवाय बॉम्ब शोधक पथकाने मंदिराची कसून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर पोलिसांची वज्रदल देखील महालक्ष्मी मंदिर परिसरात दाखल झाले आहे.