पावसाची गती आणखी वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यत पुराचा धोका वाढीस लागला आहे. राधानगरी धरणाचे ५ दरवाजे शुक्रवारी पुन्हा उघडण्यात आले. यामुळे  शहरातून वाहणाऱ्या पाणचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून ती धोका रेषेच्या दिशेने वाहू लागली आहे. या नदीवरील शिवाजी पुलावरून रत्नागिरीला होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दिवसभर आणखी १७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. १४ नद्या पात्राबाहेरून वाहू लागल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सलग तीन दिवस कोसळणारा पाऊस काही काळ विश्रांती घेताना दिसत होता, पण आज त्याने पुन्हा तोंड वर काढले. पहाटेपासून माध्यम ते जोरदार धारा बरसत राहिल्या. पावसाने जोर धरल्याने शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी पार करू आता धोका पातळीकडे वाहत आहे. इशारा पातळी ३९ फूट असून ती रेषा नदीने सकाळी ७ वाजताच पार केली. सायंकाळी ती ४१ फुटांवरून वाहत होती. आता ती ४३ या धोका पातळीकडे वेगाने सरकू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. नदी पातळी ४२ फुटांवर आल्यावर ती पुलाच्या माश्याच्या प्रतिकृतीस स्पर्श करते. याला स्थानिक भाषेत मच्छिन्द्री झाल्याचे बोलले जाते. आज मच्छिन्द्री झाली. नदीची वाढती पाणीपातळी पाहून प्रशासनाने शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली. यामुळे रत्नागिरी, शाहूवाडी, पन्हाळा, जोतिबा या मार्गावरील वाहतूक बंद झाली. ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

राधानगरी धरणाचे आज पुन्हा ५ दरवाजे उघडले गेले. त्यातून ९३४० प्रति सेकंद विसर्ग सुरू होता. यामुळे पंचगंगा नदीचे पाणी वाढू लागले आहे. हे धारण ९९.२३ टक्के म्हणजे पूर्ण भरले आहे.

काल जिल्हय़ातील ५० बंधारे पाण्याखाली होते, आज त्यामध्ये १७ ची भर पडून ही संख्या ६७ वर गेली.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी ४६.३६ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.  तालुकानिहाय पाऊस मि.मी मध्ये पुढील प्रमाणे आहे- करवीर ३५.२७, कागल ४०.७५, पन्हाळा ७१.४२, शाहुवाडी ७३.०० हातकणंगले २०.७५, शिरोळ १८.८५, राधानगरी ६६.००, गगनबावडा ७६.००, भूदरगड ४५.६०, गडिहग्लज १९.५७, आजरा ४५.२५ व चंदगड ४३.८३ अशी एकूण ५५६.२९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

 

 

Story img Loader