कोल्हापूर : देशातील ऊस गाळप हंगाम मध्यावर आला असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत देशांतर्गत साखरेच्या उत्पादनात तब्बल २० लाख टनांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हंगामाची सांगता होईपर्यंत ही घट ४० लाख टनांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाबाजुला केंद्र सरकारने १० लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिली असताना आता देशांतर्गत उत्पादनात घट होत असल्याने नजीकच्या काळात साखरेची दरवाढ होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान उत्पादन घटल्याने कारखान्यांच्या तोट्यातही वाढ होणार आहे,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रसह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्याने यावर्षीचा साखर गळीत हंगाम वेगवेगळ्या कारणांमुळे महिनाभर पुढे गेला. आता त्याने गती घेतली असली तरी हाती आलेले आकडे बहुतेक राज्यातील उत्पादन घटीचे आहेत. देशातील साखर उत्पादक प्रमुख ११ राज्यांतील ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा अशा सर्व बाबतीतील आलेख यंदा घसरणीला लागल्याचे दिसत आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीनुसार देशात मकरसंक्रांतीपर्यंत साखरेचे उत्पादन २०.६५ लाख टनांनी (१३.६६ टक्के) घसरले आहे. मागील वर्षी याच कालावधीत १५१ लाख टन असणारे साखरेचे उत्पादन यंदा १३० लाख टनांवर खाली आले आहे. एकाबाजुला १० लाख टन साखरेच्या निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली असताना आता देशांतर्गत उत्पादनात घट होत असल्याने नजीकच्या काळात साखरेची दरवाढ होण्याची चिन्हे आहेत.

गाळपही घटले

गतवर्षी ५२४ कारखान्यांनी ऊस गाळप केले होते. यंदा ही संख्या ५०७ पर्यंत घसरली आहे. १५ जानेवारीपर्यंत देशातील साखरेचा सरासरी उतारा ८.८१ टक्के आहे. पण गतवर्षी तोच ९.३७ टक्के इतका अधिक होता. गतवर्षी या कालावधीत १६१२ लाख टन ऊस गाळप झाले होते. यावर्षी ते १४८२ लाख टन गाळप झाले आहे. एकट्या महाराष्ट्रात १०० लाख टन ऊस गाळप कमी झाले आहे.

उत्पादन घटण्याची कारणे

– गाळप हंगाम उशीरा सुरू होणे

– उशीरा गाळपामुळे साखर उताऱ्यावर परिणाम

– विविध रोगांचा प्रादुर्भाव

– थंडीचा अभाव आणि उष्णतेमुळे उसातील साखरेवर परिणाम

गेल्यावर्षीची तुलना करता सध्या २० लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. हीच स्थिती कायम राहिली तर हंगाम अखेरपर्यंत ही घट ४० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. परिणामी कारखान्यांच्या तोट्यात वाढ होणार आहे, तर दुसरीकडे साखरेचे दर काही प्रमाणात वाढतील.- प्रकाश नाईकनवरे,

कार्यकारी संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ. यंदा देशभर विविध कारणांनी गाळप हंगामास विलंब झाल्याने ऊसाचे गाळप पिकाचे वय उलटून गेल्यावर होत आहे. शिवाय यंदा हिवाळाही उशीरा सुरू होत उष्णतेचा काळ अधिक राहिला. याचा परिणामही उसातील साखरेवर झाला आहे. शिवाय ऊस पिकावर लाल कुजण्यासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या साऱ्यांच्या परिणामी साखरेच्या उत्पादनात मोठी घट दिसत आहे. एका बाजुला साखर कारखानदारीला निर्यातीचा फायदा होणार असला तरी उत्पादन घटल्याचा तोटा सहन करावा लागणार आहे. सध्या साखर कारखाने प्रतिटन ५०० ते ६०० रुपये इतका तोटा सहन करीत आहेत. केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉल खरेदी किंमत वाढवून साखर उद्योगाला दिलासा द्यावा. – पी. जी. मेढे – साखर अभ्यासक

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sugar production declines by 2 million tonnes zws