कोल्हापूर : किल्ले विशाळगड मुक्त किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्त आंदोलनाला हिंसक ओळख लागल्यानंतर कायदा सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी जिल्ह्यात आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल एडके यांनी बुधवारी आदेश जारी केले आहेत.

जिल्हयातील किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणा बाबत

काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफित भ्रमणध्वनीच्या माध्यमातून किंवा सामाजिक माध्यमे याद्वारे प्रसारित करुन याद्वारे सामाजिक अस्थिरता, तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेचे दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३चे कलम २६३ अन्वये दिनांक १७ जुलै पासून कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे आणि कोल्हापूर जिल्हा हद्दीमध्ये वरील विषयाच्या अनुषंगाने व समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग प्रदर्शित करणेस मनाई केली आहे.

हेही वाचा…विशाळगडावर पाहणीसाठी गेलेल्या शाहू महाराज, सतेज पाटलांसमोर महिलांनी फोडला टाहो

जिल्हयातील किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणाविरोध दिनांक १४ जुलै रोजी आंदोलन सुरु केले होते. या दिवशी सकाळी विशाळगडावरील अतिक्रमण विरोधात आलेले सर्व संघटना कार्यकर्ते यांनी आंदोलन करुन मोठया संख्येने जमलेल्या जमावाने घोषणाबाजी करीत परत जात असताना अचानक दगडफेक करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान केले. आंदोलकांच्या अशा वर्तनामुळे सर्वसामान्य जनतेत भितीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरील सर्व घटनांचे व्हिडीओ, रिल्स, फोटो इत्यादीचे काही लोक सोशल मीडीया मार्फत तसेच प्रसारमाध्यमामधून पसरवून समाजामध्ये अस्थिरता निर्माण करीत आहेत. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून प्रक्षोभक संदेशाव्दारे अफवा पसरविल्या जात आहेत.नमूद घटनेच्या पार्श्वभूमीवर एखादे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्ह्यात हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

हेही वाचा…विशाळगडावर दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणांवर घाव

या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२२३ मधील तरतुदी व प्रचलित कायद्यान्वये फौजदारी कारवाईस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आदेशात नमूद केले आहे.