लोकांना पिण्याला आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नसल्याची ओरड होत असताना उद्योगास पाणी दिले जात असल्याची तक्रार होऊ लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींनाही शासनाच्या निर्देशानुसार २५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय ही पाणीकपात बंद होण्याची शक्यता कमी असून, उद्योजक व कंपन्यांनीही पाणीबचतीलाच प्राधान्य दिले आहे. याबाबतच्या नोटिसा एम.आय.डी.सी. कंपन्यांना बजावल्या आहेत.
कागल येथील सिद्धनेर्ली येथील दूधगंगा नदीच्या तीरावरून एमआयडीसीने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली असून, नदीचे पाणी विकासवाडी येथील जलकुंभामधून शुद्धीकरण करून सर्वत्र पुरविले जाते. व्यापारी, वाणिज्य, प्रकल्पग्रस्त गाव असे वर्गीकरण असून, प्रकल्पग्रस्त गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, हुपरी, उजळाईवाडी या गावांना ही सवलतीच्या दरात स्वच्छ पाणी दिले जाते. सध्या वंदुर ते कागल बंधाऱ्याजवळ व सिद्धनेर्ली एमआयडीसी जलउपसा केंद्राच्या नदीपात्राच्या वरील बाजूस वाळू उपसा मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गढूळ पाणी येत असल्याचे पत्र एमआयडीसीने तहसीलदारांना दिले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. एस. वराळे, सहायक अभियंता के. पी. िदडे यांनी दिली आहे. त्यामुळे शुद्धीकरणावर मर्यादा येत असून, जिल्हाधिकारी यांनी याबाबत लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
या पाणीकपातीमुळे हमखास पाण्यावर अवलंबून असलेल्या शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित वसाहती उद्योगांना पाण्याची झळ सोसावी लागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या वसाहतींना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून देताना उद्योग धोरणानुसार जलशुद्धीकरण केंद्र व पाणीपुरवठा केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्राद्वारे वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींना पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा २४ तास उपलब्ध करून दिला जातो. कोल्हापुरातील वसाहतींना व एमआयडीसी प्रकल्पग्रस्त गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा प्रथमच ही पाणी कपात लागू करण्यात आली असून, कारखानदारांनाही तशा प्रकारच्या पाणीकपातीच्या नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत.