कोल्हापूर : दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व खात्याच्या दोघा निवृत्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी अंबाबाई मूर्तीची पाहणी केली. उद्या पुन्हा पाहणी करुन त्याचा अहवाल न्यायालयाकडे सादर केला जाणार आहे.
अंबाबाई देवीची मूर्तीची नाजूक अवस्था लक्षात घेता पुरातत्व खात्याच्या तज्ञांकडून तिची पाहणी करण्याबाबतचा दावा श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. याबाबत निकाल देताना २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने भारतीय पुरातत्व खात्याच्या दोघा निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.
तीन तास पाहणी
त्यानुसार आज निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि आर. एस. त्र्यंबके या दोन्ही तज्ञांनी मूर्तीची सुमारे तीन तास पाहणी गाभाऱ्यात जाऊन केली. मूर्तीची स्नानापूर्वीची आणि स्नानानंतरची स्थिती तसेच अन्य पाहणीच्या नोंदी त्यांनी केल्या आहेत. शुक्रवारी सकाळी पुन्हा संपूर्ण मूर्तीची पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल ते न्यायालयाला सादर करणार आहेत. सध्या तरी मूर्तीच्या सध्यस्थितीबाबत दोन्ही तज्ञांनी माध्यमांना माहिती देण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा – माढ्यात भाजप उमेदवारीची झळ शिवसेना शिंदे गटाला; संपर्कप्रमुखाचा राजीनामा
या पाहणीवेळी वादी श्रीपुजक गजानन मुनिश्वर, देवस्थान समिती सचिव सुशांत किरण बनसोडे, पुरातत्व खात्याचे उत्तम कांबळे, लाभेश मुनिश्वर, अजिंक्य मुनिश्वर, प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई, महादेव दिंडे, माधव मुनिश्वर, अजित ठाणेकर उपस्थित होते.