कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित चौथा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुक्रवार, १८ डिसेंबरपासून येथे सुरू होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने देण्यात येणारा कलामहर्षी बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार कन्नड सिनेमाचे ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीष कसरावल्ली यांना तर चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार मराठीतील ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना देणार असल्याची घोषणा संयोजक दिलीप बापट व चंद्रकांत जोशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
१८ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१५ (किफ) चे उद्घाटन अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते व संध्या गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. त्यानंतर महोत्सवादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जागतिक, प्रादेशिक, कलात्मक चित्रपटासह लघुचित्रपट यांचा समावेश असलेल्या चित्रपटामध्ये अप्रदíशत, नवीन दिग्दर्शकांचे दहा मराठी चित्रपट आणि १९५५ सालातील गाजलेले संगीतप्रधान ७ चित्रपट हे खास आकर्षण असेल.
कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचा १९३६ चा प्रतिभा हा चित्रपट, जागतिक दर्जाचे दिग्दर्शक रिचर्ड एॅटेनबरो दिग्दíशत चार्ली हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार गिरीष कसरावल्ली यांना १८ रोजी तर आनंदराव पेंटर पुरस्कार अशोक पत्की यांना २५ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी मायमराठी चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता, अभिनेत्री व पटकथा यांना बी नांद्रेकर स्मृती पुरस्कार प्रेक्षक पसंती व समीक्षक यांच्यानुसार देण्यात येणार आहे.
लघुपट स्पध्रेतील १५ लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात होणार असून विजेत्यांना अभिनेता दिग्दर्शक ऋषिकेश जोशी, साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते १९ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कलावंत महोत्सवात उपस्थित राहून रसिकांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय रविवार २० रोजी किरण शांताराम, दिलीप प्रभावळकर यांच्या उपस्थितीत १९१३ ते २०१४ मराठी चित्रपटसूची प्रकाशन अभिवाचन, सोमवार २१ रोजी सतीश जकातदार यांच्या ‘हकिकत सिनेमाची’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. हिमांशू स्मार्त यांच्या उपस्थितीत, मंगळवार, दि. २२ रोजी जागतिक सिनेमा (पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन) गणेश मतकरी यांच्या उपस्थितीत, बुधवार २३ रोजी बदलता मराठी सिनेमा याबाबत व्याख्यान, समीक्षक मकरंद ब्रम्हे हे देणार आहेत. गुरुवार २४ रोजी स्थानिक उभरते कलावंत यांचा सत्कार होणार आहे.
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून
कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित चौथा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुक्रवार, १८ डिसेंबरपासून येथे सुरू होत आहे.
Written by बबन मिंडे
Updated:
First published on: 17-12-2015 at 02:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International film festival in kolhapur