अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी बुधवारी पोलिसांचे एक पथक पुण्याला रवाना झाले. दाभोलकर व पानसरे हत्येचा एकत्रित तपास केला जाणार असून, एकाच वेळी तावडे व समीर गायकवाड यांची कसून तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

डॉ. तावडेचा ताबा मिळण्यासाठी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे कोल्हापूर  पोलिसांनी अर्ज सादर केला. त्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या आदेशाची प्रत पुणे न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्यानंतर ‘सीबीआय’चा तपास पूर्ण झाल्यावर त्याचा ताबा घेऊन कोल्हापुरात चौकशीसाठी आणले जाणार आहे. पानसरे हत्येप्रकरणी यापूर्वी समीर गायकवाड याला अटक केली आहे. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या डॉ. तावडे याचा पानसरे हत्येशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे तावडे व गायकवाड यांचे कोल्हापुरातील वास्तव्य, त्यांचे संबंध, सनातन संस्थेसाठी केलेले कार्य, पानसरे-दाभोलकर हत्येचा कट आदी मुद्यांची चौकशी केली जाणार आहे.