कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाची दखल घेत कोल्हापूर बरोबरच इचलकरंजी शिरोळ येथे मंगळवारी सायंकाळी संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर बोलताना उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आजच्या संयुक्त पाहणीमध्ये नदी प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत तयार करण्यात आलेल्या शासकीय अहवालात जे मुद्दे नोंद केले आहेत, ते पुरावे म्हणून उच्च न्यायालयात ६ जून रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

गेल्या तीन दिवसापूर्वी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीघाटावर काळे दुर्गंधीयुक्त पाणी येऊन मासे मृत्यूमुखी पडले होते, याबाबत वृत्तपत्रांनी दखल घेतली होती. त्यादरम्यानच्या पार्श्वभूमीवर काल जयंती नाला कोल्हापूर येथून विनाप्रक्रिया रासायनिक सांडपाणी पंचगंगेत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी याबाबत उच्च न्यायलयात याचिका दाखल केली असून त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सदर प्रदूषित पाण्याची पाहणी करून नमुने घेण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात कोल्हापूर येथे नमुने घेतल्यानंतर दुपारच्या सत्रात पंचगंगेच्या शेवटच्या टोकावरील हेरवाड बंधाऱ्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन हरभट, त्याचबरोबर नायब तहसीलदार योगेश जमदाडे, याचिकाकर्ते दिलीप देसाई इचलकरंजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी भेट दिली. यावेळी तेरवाड बंधाऱ्यावरून फेसाळलेल्या काळ्यापाण्याचे नमुने घेण्यात आले. त्याचबरोबर इचलकरंजीतील काळा ओढा येथेही भेट दिली. तेथील दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याचे नमुने व तेच पाणी उसाच्या शेतीसाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा – हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा

हेही वाचा – पालकमंत्री कोल्हापूरवासीयांना फसवत आहात; मुश्रीफ यांनी माफी मागावी, शिवसेनेची मागणी

सदर विना प्रक्रिया केलेल्या पाण्याचे नमुने घेण्यात आले असून सदर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी सदर पाण्याच्या नमुन्याचे अहवाल हे उच्च न्यायालयाचे याचिकेत न्यायालयाचे कामकाज चालू झाल्यानंतर सहा जून रोजी दाखल करण्यात येतील. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी व पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे भेटीदरम्यान सांगितले. यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजूदादा आरगे, सुहास पाटील, अभिजीत पटवा तसेच प्रदूषणाविरोधात लढणारे विश्वास बालिघाटे, बंडू पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर उपस्थित होते.

Story img Loader