कोल्हापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीला धार आली असताना साखरेच्या पट्ट्यात राजकारणाशी समांतर जाणाऱ्या साखर कारखानदारीशी संबंधित प्रश्न पेटले आहेत. साखर कारखान्याच्या प्रवासातील चढ-उतार, कारखान्यातील गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार यांचे मुद्दे उपस्थित करत उमेदवारांची कोंडी केली जात आहे. अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात विधानसभेपेक्षा साखर कारखानदारीच्या राजकारणाचा मुद्दा डोकेदुखीचा बनत चालला आहे.
आत्यंतिक लढत असलेल्या कागल मतदारसंघात गडहिंग्लज कारखान्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कारखान्यावर जनता दलाचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांची सत्ता होती. त्याचा संदर्भ घेत त्यांच्या कन्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी आमच्याकडील हा कारखाना हसन मुश्रीफ यांनी कारस्थान करून काढून घेतला, असा आरोप चालवला आहे. अलीकडे मुश्रीफ यांनी या कारखान्याची सूत्रे पुन्हा एकदा डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याकडे सोपवली होती. या दोघात आता बिनसले आहे. शहापूरकर यांनी प्रचारात मुश्रीफ यांच्यामुळे कारखाना बंद पडल्याचा आरोप चालवला आहे. तर दुसरीकडे बंद पडलेला गडहिंग्लज कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरू करून शेतकऱ्यांसह कामगारांना आधार दिला आहे. त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आणलेली ब्रिस्क कंपनी कारखाना सोडून गेली. शहापूरकर यांच्या मनमानी कारभारामुळे कारखाना अडचणीत आला ,असा मुद्दा उपस्थित करीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी मुश्रीफ यांची तरफदारी चालवली आहे.
आणखी वाचा-इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
चंदगड मधील दौलत कारखाना आता तालुक्याबाहेरील मानसिंग खराटे यांच्या ताब्यात गेला आहे. ते जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणुकीस उभे आहेत. बंद पडलेला कारखाना चालू केल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस आल्याचा मुद्दा त्यांच्याकडून मांडला जात आहे. त्यांचे विरोधक बाहेरून आलेले खोराटे हे इंग्रजांप्रमाणे येऊन तालुक्यावर राज्य करतील. निवडणुकीचा खर्च ते उद्या शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारतील, अशी भीती विरोधक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात पूर्वी नरसिंगराव पाटील, गोपाळराव पाटील यांनी कारखान्याचेअध्यक्षपद असताना विधानसभा लढवली. पण त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. हा इतिहास पाहता खोराटे यांची अवस्था कशी राहील, असाही मुद्दा चर्चेत आहे.
शिरोळ तालुक्यात शरद कारखान्याचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि दत्त कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील या महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन कारखानदारात लढत होत आहेत. गुरुदत्त शुगरचे तिसरे कारखानदार माधराव घाटगे हे युतीचा धर्म पाळत आहेत. गणपतराव पाटील यांनी प्रचार सभेत जवाहर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार कलाप्पांना आवाडे यांचा नामोल्लेख आवर्जून केला होता. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी जुने मित्र उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली असताना आंदोलन अंकुश ही संघटना त्यांच्यात सहभागी झाली आहे. दोन्ही शेतकरी संघटनेचे नेते दोन्ही साखर कारखानदारांवर तुटून पडत आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीत कारखानदार निवडून येणार की शेतकऱ्यांचा प्रतिनिधी याची चर्चा आहे.
आणखी वाचा-केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
राधानगरीत उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या बिद्री कारखान्याची आसवनी चौकशीचे प्रकरण गाजले होते. ही चौकशी म्हणजे आमदार प्रकाश आबिटकर यांचे कुटील कारस्थान असल्याची टीका माजी आमदार, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के. पी. पाटील करीत आहेत. बिद्रीच्या माध्यमातून पाटील हे दरवर्षी कोट्यवधींचा भ्रष्टाचार करतात, असा पलटवार आबिटकर यांनी केला आहे. एकंदरीत निवडणूक विधानसभेची असली तरी साखर कारखानदारीचे राजकारण चांगलेच तापले असून तेच काही मतदारसंघात निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.