कोल्हापूर : उद्योगाची उभारणी करून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने एका महाठकसेनाने सुमारे ३५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करीत कर्नाटकातील निमीत सागर महाराज यांनी हुपरी येथे ठकसेनच्या दारात उपोषण सुरू केले. मंगळवारी याबाबत समाजाच्या काही प्रमुखांनी मध्यस्थी केल्यानंतर तूर्तास पोषण मागे घेतले आहे. फसवणूक झालेल्यातील काही रक्कम परत दिली जाण्याची शक्यता प्रमुखांनी वर्तवली आहे.
हुपरी येथील राजू नेर्लीकर याच्या विरोधात यापूर्वी फसवणुकीच्या बऱ्याच तक्रारी झाल्या आहेत. त्याने विविध उद्योगांची उभारणी करून मोठा परतावा मिळवून देतो असे आमिष हुबळीजवळील निमीत सागर महाराज यांना दाखवले होते. या प्रकरणात ३५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तोंडी माहिती महाराजांनी हुपरी पोलिसांना दिली होती. त्यावरून त्यांनी ठकसेन नेर्लीकरच्या घरासमोर उपोषण सुरू केले. यानंतर आज दिवसभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. जैन समाजाचे प्रमुख, भाजपाचे नेते महावीर घाट, अजित पाटील, बाहुबली घाट, सुनील घाट आदींनी नेर्लीकर याच्याशी चर्चा केली. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यातून काही रक्कम महाराजांना परत करण्याचे ठरले आहे. विशेष म्हणजे त्यानंतर महाराज या ठकसेनेच्या घरी गेल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा – पुण्यात गुंडांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त : सात पिस्तुलांसह २४ काडतुसे जप्त
रक्कम आली कुठून ?
दरम्यान, निमीत सागर महाराजांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मात्र त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम आली कशी, त्यांनी याबाबतचे हिशोब न ठेवता ठकसेनाकडे ती सोपवली कशी, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षात २२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आकडा असला तरी त्यांना सात ते आठ कोटी रुपये परत केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.