ऊस उत्पादकांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या एफआरपीपेक्षा अधिक रक्कम जवाहर सहकारी साखर कारखान्याने गत दहा वर्षांपासून अदा केलेली आहे. पुढील गळीत हंगामातसुध्दा एफआरपी देण्यासाठी कारखाना बांधील असून अडचणीत असलेली साखर कारखानदारी लक्षात घेता ही रक्कम ऊस पुरवठाधारकांना तीन हप्त्यात देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीची रक्कम एकरकमी देण्याची केलेली मागणी उपस्थित सभासदांनी धुडकावून लावत अध्यक्ष आवाडे यांच्या ठरावाला आवाजी मतदानाने मंजुरी दर्शविली.
जवाहर साखर कारखान्याची २६वी वार्षकि साधारण सभा कार्यस्थळी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. आवाडे म्हणाले,‘जवाहर कारखान्याच्या स्थापनेपासून कारखान्याने सभासद आणि शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. प्रारंभी अडीच हजार टन गाळप क्षमता असलेल्या जवाहर साखर कारखान्याने अनेक मापदंड निर्माण केले आहेत. गेल्या १० वर्षांत १ कोटी २० लाख टन ऊसाचे गाळप करून सभासद शेतकऱ्याला एफआरपी व्यतिरिक्त ७२९ कोटी ५९ लाख रूपये जादा देऊन जवाहरने आदर्शवत कामे केले आहे. बाजारातील अडचणी बरोबरच पुढील काळात शासनाने कर्जापोटी दिलेल्या अबकारी कराच्या पशाची परतफेड करावी लागणार असल्याचे सांगितले.
कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी सभा नोटिशीचे वाचन केले. कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी, सभासदांचे हित नजरेसमोर ठेवून वाटचाल केल्यामुळेच जवाहर कारखान्याने सहकारी साखर कारखानदारीत वेगळा ठसा उमटविला असल्याचे सांगितले. संचालक विलास गाताडे यांनी आभार मानले.
एफआरपी देण्यासाठी ‘जवाहर’ बांधील
पुढील गळीत हंगामातसुध्दा एफआरपी देण्यासाठी कारखाना बांधील
Written by अपर्णा देगावकर
First published on: 27-09-2015 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawahar committed to frp