जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याना गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या ४ लाख ६४ हजार मेट्रीक टन उसाची ६० कोटी ४० लाख इतकी रक्कम येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अदा करणार आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची प्रतिटन रुपये २५०० प्रमाणे ऊसबिले अदा होणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
एफआरपीप्रमाणे प्रतिटन २४२९ इतकी रक्कम देय होत असतानाही कारखान्याने २५०० रुपयेप्रमाणे बिले अदा केली आहेत. या हंगामात फेब्रुवारी अखेर गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम यापूर्वीच कारखान्याकडून अदा केलेली आहे. १ मार्च ते २६ एप्रिलअखेर गाळपास आलेल्या ४ लाख ६४ हजार मेट्रीक टन उसाचे प्रतिटन १२०० रुपयांप्रमाणे होणारे बिल यापूर्वीच अदा केलेले आहे. आता राहिलेली प्रतिटन १३०० रुपयांप्रमाणे होणारी ६० कोटी ४० लाखांची रक्कम कारखान्याकडून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या पंधरा दिवसांत जमा केली जाणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले.
साखरेच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे बहुतांशी कारखान्यांना एफआरपी रक्कम अदा करता आलेली नाही. तशातच चालू वर्षी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. अशा प्रसंगी जवाहर साखर कारखान्याकडून राहिलेली उसाची बिले अदा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Story img Loader