लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी राजकीय खेळी करीत महायुतीवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. यातून त्यांनी शुक्रवारी हातकणंगले राखीव मतदारसंघात पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री जयवंत कुरणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ताराराणी पक्षाकडून अपक्ष निवडून आलेले आमदार आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला. महायुतीच्या उमेदवारीत अडथळे येत असल्याने त्यांनी जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा लढवण्याचे जाहीर केले आहे. इचलकरंजीत सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी आज जयश्री कुरणे यांचे नाव समोर आणले आहे.
आणखी वाचा-कोल्हापुरात वृद्ध रुग्ण डोलीतून रुग्णालयात दाखल
हेर्ले (ता. हातकणंगले ) येथील कुरणे यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. क्षितिज सामाजिक संस्थेच्या संस्थापिका, महिला राजसत्ता आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक असलेल्या कुरणे यांनी पंचायत राज विभाग, जल जीवन मिशन, राजकीय विकास नेतृत्व येथे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.