कोल्हापूर : पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या; या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटली . बावनकुळे यांच्या विधानाच्या निषेधार्थ कोल्हापुरातील पत्रकारांनी काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी चप्पल दाखवत आंदोलन केले. अलीकडे भाजप विरोधात भूमिका घेणाऱ्या पत्रकारांवर पक्षातून आरोप केले जात आहेत. चाय बिस्कुट पत्रकार, पाकीट पत्रकार अशा शब्दात पत्रकारांना अवमानित केले जात आहेत. तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर, न्या, त्यांना क्वार्टर द्या, असे म्हणत मद्यपानाचा सल्लाही दिला आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूर : पट्टणकोडोलीत तुळजाभवानी मंदिरात चोरी; दागिने, दाननिधी लांबवला
बावनकुळे यांच्या या विधानाचा कोल्हापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. कोल्हापूर प्रेस क्लब समोर पत्रकारांनी काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायतान दाखवत बावनकुळे यांचा निषेध केला. बावनकुळे पुढील महिन्यात कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत तेव्हा त्यांना याचा जाब विचारला जाईल, असा निर्धार यावेळी करण्यात आला. महाराष्ट्रातील पत्रकारांना सन्माननिधी देण्यामध्ये आडकाठी आणण्याचे काम भाजपचे सरकार करत असताना त्यांचे प्रदेशाध्यक्ष मात्र पत्रकारांना आव्हानित करत आहेत. बेजबाबदार वर्तन करत करणाऱ्या बावनकुळे यांनी पत्रकार आणि जनतेचे माफी मागावी, अशी मागणी प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, कार्याध्यक्ष दिलीप भिसे यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांनी केली.