कोल्हापूर : जमीन बिगर शेती करण्याकरिता ३० हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी कागल तहसील कार्यालयातील एक अवर कारकून मंगळवारी रंगेहात पकडली गेली. अश्विनी अतुल कारंडे (वय ४६, रा. शाहूपुरी कोल्हापूर) असे कारवाई झालेल्या महिलेचे नाव आहे. तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यासाठी त्यांनी कागल तालुक्यात भाडे करारावर जमीन घेतली आहे. ही जमीन बिगर शेती करण्यासाठी त्यांनी कागल तहसील कार्यालयात मूळ मालकांच्या वतीने अर्ज दिला होता.
हेही वाचा >>> ख्रिस्ती, मुस्लीम संस्थांना विदेशातून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध; मिलिंद परांडे यांचा आरोप
हे काम अवल कारकून अश्विनी कारंडे यांच्याकडे होते. ते करण्यासाठी त्यांनी ६० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेची ही रक्कम स्वीकारत असताना कारंडे या लाच लुचपत खात्याच्या जाळ्यात रंगेहात सापडल्या. त्यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले.