कोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात असून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवेळी प्लास्टीक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जोतिबा डोंगरावरील एमटीडीसी सभागृहात आयोजित श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथील श्री जोर्तिंलिंग देव यात्रेच्या पूर्व तयारी नियोजन बैठकीत ते बोलत होते.  

जोतिबा चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधा व सुरक्षेसाठी पश्चिम देवस्थान समिती, जिल्हा परिषद, पोलीस व वाहतुक प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन विभाग, अन्न व औषध विभाग, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक, सहजसेवा ट्रस्ट, व्हाईट आर्मी व ग्रामपंचायत आदी विभागांनी केलेल्या नियोजनांच्या माहितीनुसार आवश्यक सुधारणा व वेळेत उपाययोजना करण्याबाबत सूचना जिल्हा प्रशासनाकडून यावेळी देण्यात आल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, कोल्हापूर विभागाचे डाक विभागाचे प्रवर अधीक्षक अनुराग निखारे, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, पन्हाळा-शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार, आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संकपाळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, उपअभियंता सुयश पाटील, यात्रा नियोजनातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी व स्थानिक वाडीरत्नागिरीचे व्यापारी, पुजारी, ग्रामस्थ आदी बैठकीस उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे व आभारप्रदर्शन तहसिलदार माधवी शिंदे यांनी केले.

कागदी, कापडी पिशव्यांचा वापर

यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत असून यात्रेवेळी जोतिबा डोंगरावर व्यापारी, भाविकांनी, स्थानिक नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करु नये. पर्यावरणपूरक कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. अन्न, पाणी, फराळाच्या वस्तू दान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लॅस्टिकचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. या बैठकीपूर्वी वेगवेगळ्या विषयावर आढावा घेण्यात आला आहे. आज झालेल्या बैठकीत प्रत्येक संबंधित विभागाने याबाबत सादरीकरण केले. पोलिस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरक्षा आणि आरोग्य विषयक आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

कापडी पिशव्यां प्रदान

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार प्लास्टिक बंदीला साथ देत कोल्हापूर विभागातील डाकघर प्रवर अधीक्षक अनुराग निखारे यांच्या सहकार्याने जोतिबा चैत्र यात्रेसाठी श्री केदारलिंग जोतिबा देवस्थान मंदिरास १० हजार पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.

विकास आराखडा विश्वासात घेवूनच

चैत्र यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीवेळी उपस्थित स्थानिक ग्रामस्थ, पुजारी व व्यापाऱ्यांना जोतिबा विकास आराखड्यांची माहिती देताना स्थानिकांना विश्वासात घेवूनच प्रशासनामार्फत विकास करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.