कोल्हापूर: कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी राज्याच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेऊन अजित पवार यांच्या माध्यमातून घेऊन मंत्रीपद पटकावले. त्यामुळे कोल्हापूर भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे नाराज झाले असून ते पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू होती. मात्र या सर्व गोष्टींना नकार देत करीत आज घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघ लढणार आणि विक्रमी मताधिक्याने निवडणूक जिंकणार असा निर्धार केला. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या बदललेल्या भूमिकेवरही टीका केली.
आज कागल येथे घाटगे गटाचा मेळावा झाला. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी राज्यातील बदललेल्या घटनाक्रमाचा उल्लेख केला. ते म्हणाले, या प्रकारामुळे खरेच काही सुचत नव्हते. मी निशब्द होतो; हताश होतो. अशावेळी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संपर्क साधला. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानुसार आता लढायचे ठरवले आहे.
आणखी वाचा-कोल्हापुरात भाजप- शिवसेनेत आधीच धुसफूस त्यात आता राष्ट्रवादीची भर
मी पक्षातून बाहेर पडावे यासाठी काहींचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी सर्व पक्षांना माझ्याशी संपर्क करून मी त्यांच्या पक्षात जावे यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्याला मी दाद दिली नाही. कोण्या बुद्रुकसाठी मी पक्ष का सोडावा, असा सवाल करत त्यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.
गुरुचे महत्त्व किती आहे हे आपण सर्व जाणतो असा, उल्लेख करून घाटगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे माझे गुरु आहेत. त्यांची साथ मी कधी सोडणार नाही. मात्र काहींनी गुरु सातत्याने बदलले आहेत. रक्ताचा शेवटच्या थेंब असेपर्यंत गुरुची साथ सोडणार नाही असे म्हणणारे बदलले गेले आहेत, अशा शब्दात त्यांनी मुश्रीफ यांच्या बदललेल्या भूमिकेवर टीका केली.
आता लढायचे नाही तर कागल मतदारसंघावर स्वराज्याचा भगवा फडकवायचा आहे. रविवार पर्यंत आपल्याला या मतदारसंघात जितके मताधिक्य मिळणार असे वाटत होते. बदललेल्या परिस्थितीमुळे त्यात फरक पडला असून आता मताधिक्यात दुप्पट वाढ होईल, असा विश्वास घाटगे यांनी व्यक्त केला.