कराड शहर व परिसरात रविवारी तापमानाचा पारा प्रथमच चाळिशीपार झाल्याने कराडकर अक्षरश: हैराण झाले आहेत. असेच वातावरण नजीकच्या परिसरात असून, त्याचा विपरीत परिणाम बाजारपेठांवर दिसून येत आहे. कमालीच्या उष्म्यामुळे दुपारच्या प्रहरी बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. प्रथमच इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागल्याने लोकांना उष्णतेचा त्रास असह्य ठरू लागला आहे.
विशेष म्हणजे पाण्याचा सुकाळ म्हणून ओळख असलेल्या कृष्णा-कोयनेच्या काठावरही ओढे, नाले पूर्णत: कोरडे पडून असून, विहिरी, कूपनलिकांसह भूगर्भातील पाणीपातळी खालवल्याने त्याचा शेतपिकांवर व पिण्यासाठीच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. कराड तालुक्यातील सुमारे ५० गावे टंचाईग्रस्त असून, वाढत्या तापमानामुळे शारीरिकदृष्टय़ा कमकुवत लोक हवालदिल असल्याने एकंदरच समाजजीवन अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा