गेल्या दहा दिवसांपासून मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता उद्या रविवारी गणेश विसर्जनाने होणार आहे. लाडक्या बाप्पांना निरोप देण्याची जोरदार तयारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. ढोल ताशाच्या गजरात गणपती विसर्जन मिरवणूक काढताना ती लक्षवेधी असावी, यासाठी मंडळाचे गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
सुखकर्त्यां गणरायाचे आगमन होऊन दहा दिवस झाले. या कालावधीत मंगलमय वातावरणात गणेशोत्सव सुरू राहिला. आता मात्र मिरवणुकीने श्रींचे विसर्जन करण्याचे कार्यकर्त्यांना वेध लागले आहेत. डीजेवर बंदी असल्याने पारंपरिक वाद्यांच्या निनादात जोरदार मिरवणुका काढून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याच्या तयारीमध्ये कार्यकर्ते गुंतले आहेत. गणेश विसर्जनासाठी अत्याकर्षक देखावे, सजावट साकारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ढोल-ताशा पथके आणि सुमधुर गीतांच्या सुरावटींनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी बँडपथके यांचे मिरवणुकीत आकर्षण असणार आहे.
दान मूर्तीसाठी मंडप
अनंत चतुर्दशी दिवशी रविवारी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या तरुण मंडळे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील मंडपामध्ये महापालिकेच्या वतीने श्रीफळ, पानसुपारी देण्यात येणार आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व समजण्यासाठी रोपे भेट देण्यात येणार आहेत. विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पवडी विभागाचे २५०, आरोग्य विभागाचे ८० व इतर विभागाचे कर्मचारी, ५५ ट्रॅक्टर, बारा डंपर, पाच जे.सी.बी., चार रुग्णवाहिका व चार पाण्याचे टँकर अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. पंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी, बापट कॅम्प येथे दान केलेल्या मूर्ती ठेवण्यासाठी मंडप उभारण्यात आलेला आहे.
यंत्रणा सज्ज
इराणी खाणीवर मूर्ती विसर्जनासाठी दोन जे. सी. बी.ची व्यवस्था केलेली आहे. इराणी व बाजूच्या खाणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.
ध्वनितीव्रता मोजण्यासाठी पोलीस खात्यास कायमस्वरूपी तीन अत्याधुनिक डिजिटल मशीन्स देण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खाणीमध्ये करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.