कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत बेचिराख झाले. या घटनेस ४८ तास उलटले, तरी आग नेमकी कशामुळे लागली, याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंतही कोणत्याही यंत्रणेला पोहोचता आले नसल्याने गूढ वाढले आहे. महापालिकेचे अधिकारी वेगवेगळ्या समित्यांच्या पाहणी दौऱ्यात गुंतून राहिले आहेत. याच वेळी या घटनेमागे घातपात, अर्थपूर्ण व्यवहाराचे धागेदोरे गुंतले आहेत का, यावरून संशयाचे वारे घोंघावत आहे. या आगीसाठी महावितरण यंत्रणा कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. अग्नी लेखापरीक्षणाचा दाखला देत महापालिकेची यंत्रणा हात झटकत आहे. त्यामुळे आग लागली तरी कशामुळे, असा प्रश्न उपस्थित होत असून, संशयाची सुई अनेक जागी फिरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Keshavrao Bhosale Theater Fire : भग्न जळीत भिंती अन् राखेचे ढीग !

नाट्यगृहाच्या मागे असलेल्या खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचे पुढे आले आहे. या ठिकाणी असणारा काहींचा वावर चर्चेला कारण ठरला आहे. रात्री उशिरा येथे मद्यपी, गांजा ओढणारे स्थानिक बड्या नेत्यांची नावे सांगून बिनदिक्कत वावरत असतात. अशाच कोण्या मद्यपीच्या उठाठेवी कृत्यामुळे नशेत आग लागली का, असा प्रश्नाचा रोख आहे. खासबाग कुस्ती मैदानावर एक गादी ( मॅट ) होती. तिला आग लागून ती भडकली. जवळच असणारे लाकडी साहित्य पेटून त्यांच्या ज्वाळेत नाट्यगृहाची मोठी हानी झाल्याची शंका बोलून दाखवली जात आहे. ही शक्यता महापालिकेची चौकशी समिती, तसेच पोलिसांची गुप्तचर यंत्रणा विचारात घेणार आहे. आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे नाट्यगृहाचे नूतनीकरण, त्याचा खर्च, गैरव्यवहाराचे आरोप, पाहणी भेट याचीही सांगड घातली जात आहे.

हेही वाचा >>> केशवराव भोसले नाट्यगृह आग: कारणे दाखवा नोटीस मिळालेले अधिकारी करणार आगीची चौकशी

नाट्यगृह व खासबाग मैदान सुधारण्यासाठी शासनाने दहा वर्षांपूर्वी दहा कोटी रुपये दिले होते. दोन्ही कामांच्या नूतनीकरणाचा खर्च योग्य प्रमाणात झालेला नाही, तो केवळ कागदावर उरला आहे. महापालिका अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण व्यवहारात हात गुंतले आहेत, असा आरोप कोल्हापूर जिल्हा व शहर कृती समितीने केला होता. या संदर्भात कृती समिती, महापालिका अधिकारी यांची गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चर्चाही झाली होती. तर, कृती समिती – अधिकारी यांनी १० ऑगस्ट रोजी नाट्यगृहात प्रत्यक्ष पाहणी करण्याचेही ठरले होते. त्या आधीच दोन दिवस नाट्यगृहाला आग लागली. त्यामुळे नूतनीकरणाचे काम नेमके किती झाले होते, त्यावरचा निधी खरेच खर्ची पडला होता का, यासारखे सारेच प्रश्न आता राखेत मिसळले आहेत. त्यांची उत्तरे आता मिळणे कठीण झाले असून, ज्यांचे हात अर्थपूर्ण व्यवहारात गुंतले आहेत, तेही ताठ मानेने फिरण्यास रिकामे झाले आहेत, अशीही चर्चा रंगली आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshavrao bhosale theatre fire reason mystery continues even after 48 hours zws