कोल्हापूर : कला, क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्राला उत्तेजन देणारे राजर्षी शाहू महाराज यांना ब्रिटनच्या दौऱ्यामध्ये दोन वास्तूंनी आकर्षित केले. त्या पाहिल्या आणि त्याबरहुकूम त्याची करवीर संस्थानात उभारणी केली. त्यांपैकी एक खासबाग कुस्तीचे मैदान आणि त्याला लागून असलेले ‘पॅलेस थिएटर’; जे आज केशवराव भोसले नाट्यगृह म्हणून ओळखले जाते.
सन १९१३ मध्ये या नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली. महाराजांचे बंधू पिराजीराव घाटगे यांच्या निगराणीखाली त्याचे काम दोन वर्षांत पूर्ण झाले. त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी या पॅलेस थिएटरचे उद्घाटन १९१५ मध्ये केले. लंडनच्या ‘पॅलेस थिएटर’प्रमाणेच हे नाट्यगृह भव्य, सुशोभित, सुसज्ज होते. त्याची स्थापत्यरचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. त्या काळी ध्वनिक्षेपण यंत्रणा नव्हती. कलाकारांचा आवाज शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावा यासाठी रंगमंचाच्या खाली १५ फूट खोल एक विहीर खोदली आहे. त्यातील पाणी गटाराद्वारे प्रायव्हेट हायस्कूल, छत्रपती शिवाजी स्टेडिअम, शाहू स्टेडिअम याच्याही खालून जयंती नाल्यात एक किलोमीटर अंतरावर सोडले जाते. दर वर्षी या विहिरीची निगराणी केली जाते. या रचनेचा परिणाम असा झाला, की किंचित छोटासाही ध्वनी शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत सुस्पष्ट पोहोचायचा.
हेही वाचा – Keshavrao Bhosale Theater Fire : भग्न जळीत भिंती अन् राखेचे ढीग !
या नाट्यगृहात खांब नसल्याने कोठेही बसले, तरी परिणामकारक दृश्य अनुभवता यायचे. खाली ४१८, तर गॅलरीमध्ये २४० आसन व्यवस्था होती. शिवाय ब्रिटिश अधिकारी, ‘खाशा स्वारी’ यांच्यासाठी दोन स्वतंत्र कक्षही येथे उभारलेले होते. याच्या दर्शनी भागात बाबूराव पेंढारकर कलादालन आहे.
अशा या केशवराव भोसले नाट्यगृहाचे आत्तापर्यंत तीन वेळा नूतनीकरण करण्यात आले आहे. १९८४, २००५ आणि २०१६ मध्ये तिसऱ्यांदा नूतनीकरण करण्यात आले. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याची कामे प्रलंबित आहेत.
या रंगमंचावर हिंदी, मराठी चित्र नाट्य क्षेत्रातील नामवंतांनी सादरीकरण केले आहे. कित्येक गायकांचे सूर येथे लागलेले आहेत. अनेक सत्कार सोहळ्याची शान या सभागृहाने वाढलेली आहे. नवोदित, धडपडणाऱ्या कलाकारांना या रंगमंचावर येण्याचा ध्यास लागलेला असायचा. कलानगरी कोल्हापूरच्या कला, सांस्कृतिक क्षेत्रात चैतन्य आणण्याचे काम याच नाट्यगृहाने वर्षानुवर्षे केले.
हेही वाचा – केशवराव भोसले नाट्यगृह आग: कारणे दाखवा नोटीस मिळालेले अधिकारी करणार आगीची चौकशी
केशवराव भोसले यांचे नाव
कोल्हापुरात जन्मलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले या कलाकाराने चार वर्षांचा असताना याच रंगमंचावर पहिले पाऊल टाकले. पुढे त्यांनी बंधू दत्तोपंत भोसले यांच्यासमवेत १८ व्या वर्षी हुबळी (कर्नाटक) येथे ललित कला दर्शन नाट्य मंडळाची स्थापना केली. ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भोसले यांनी सुमारे १५ नाटकांमध्ये काम केले. बालगंधर्व हे भगिनीच्या, तर केशवराव भोसले धैर्यधराच्या भूमिकेत असलेले ‘संयुक्त मानापमान’ हे नाटक जुलै १९२१ मध्ये रंगमंचावर आले होते. या नाटकाने पुढे महात्मा गांधींनी उभारलेल्या ‘टिळक स्वराज्य निधी’साठी तब्बल १६ हजार ५०० रुपयांच्या निधीचे संकलन केले. या नाटकातील त्यांचा सहजसुंदर अभिनय पाहून राजर्षी शाहू महाराज यांनीही त्यांना ‘वन्स मोअर’ची दाद दिली होती.