लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्यास दुसऱ्या अधिकाऱ्याच्या टोळक्याने २३ लाख रुपयांचा अपहार कबूल करण्याच्या मागणीसाठी अपहरण करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शासन शालेय पोषण आहार विभागाचे लेखा अधिकारी दीपक बाळासाहेब माने यांना मारहाण झाली आहे. याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी इंद्रजीत मारुती साठे, संदीप मधुकर ठमके, संग्राम दिनकर जाधव, प्रकाश महिपती मिसाळ, उत्तम आनंदा भोसले, महादेव कृष्णा मेथे, प्रसाद संजय आमले, मंगेश तुकाराम जाधव यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तवेरा मोटार, कोयता जप्त केले आहे.

आणखी वाचा-कोल्हापूरात पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून येऊन संदीप संकपाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

फिर्यादी माने तसेच संशयित इंद्रजीत साठे यांच्या पत्नी आणि संदीप संदीप ठमके हे प्राथमिक शिक्षण विभागात नोकरीस आहेत. माने हे आज कमला महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर होते. तेथे त्यांना इंद्रजीत साठे व सोबत असलेल्यांनी बाहेर बोलावून घेऊन तवेरा मोटारीतून पळवून नेले. टेंबलाई मंदिर परिसरात त्यास बेदम मारहाण करण्यात आली.

अपहार प्रकरणाचा बोभाटा

जिल्हा परिषदेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये २३ लाखाचा अपहरणाचा गुन्हा तू कबूल कर. अपहार रकमेतील १० लाखाची रक्कम आम्हास दे. बाकीचे रक्कम तू जिल्हा परिषदेत जमा कर; अन्यथा विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणत मारहाण करून मोबाईल मध्ये चित्रीकरण करण्यात आले. इंद्रजीत साळे याने कोयत्याने मारहाण केली. या घटनेमुळे जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणाला तोंड फुटले आहे.

आणखी वाचा-हातकणंगलेत आणखी एका शेतकरी नेत्याचा अर्ज दाखल; रघुनाथदादा पाटील रिंगणात

चौकशी समिती नेमणार – सीईओ

दरम्यान या प्रकरणांमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. शालेय पोषण आहार अपहरचे प्रकरण यापूर्वीही जिल्हा परिषदेत घडले आहेत. या नव्या प्रकरणामुळे जिल्हा परिषद या प्रतिमेला तडा गेला आहे. या प्रकरणाची दखल जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. “जिल्हा परिषद शालेय पोषण आहार अपहार ,मारहाण प्रकरणाची माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे” असे कोल्हापूर जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी गुरुवारी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidnapping of officer in case of embezzlement in kolhapur zilla parishad mrj