कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रस्ते कामांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे आज आम आदमी पक्षाने अधिकाऱ्यांसमोर केलेल्या पंचनाम्यावेळी दिसून आले. यावरून आपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला. या निधीतून पाच रस्त्यांचे काम सुरु होते. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. यावर आम आदमी पार्टीने हे काम अपूर्ण असल्याचे सांगत रस्त्याचा पंचनामा करण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा…महायुतीच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक; कोणा एकावर ठपका नको – हसन मुश्रीफ

आपचे पदाधिकारी पोहचल्यानंतर फक्त शाखा अभियंता सुरेश पाटील तेथे होते. तुमचे काय ते निवेदन द्या, आम्ही वरिष्ठांना कळवू असे बोलताच आप पदाधिकारी आक्रमक झाले. तुम्हाला पत्र दिले असताना वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार, क्वालिटी कंट्रोल व डिझाईन कन्सलटंट अनुपस्थित का असा सवाल करत, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी संबंधित अधिकारी न आल्यास फावडा कुदळ घेऊन रस्त्याचे सॅम्पल महापालिकेत घेऊन जाण्याचा इशारा दिला. पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना बोलावून घेतले.

अधिकाऱ्यांची बोलती बंद

यानंतर आप पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. रस्त्याच्या सर्व तपासण्यांचा अहवाल मागितल्यानंतर अधिकारी निरुत्तर झाले. अजून अहवाल उपलब्ध नाही, उपलब्ध करून देतो अशी उत्तरे दिली. रोड क्रॉस सेक्शन प्रमाणे काम का केले नाही, एस्टीमेट मध्ये गटार चॅनेल पडदी नमूद असताना प्रत्यक्षात गटार का गायब आहे, रस्ता आधी आणि चॅनेल नंतर असे बांधकाम केल्यास रस्त्याची लेव्हल बिघडून रस्ता खराब झाल्यास अधिकारी जबादारी घेणार का? असा सवाल देसाई यांनी केला. रस्त्याचे सर्व अहवाल व कोअर काढण्याची मागणी त्यांनी केली.

हेही वाचा…इचलकरंजीत विवाहितेचा पतीकडून खून

यावर शहर अभियंता सरनोबत यांनी रस्ते करण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी राहिले असल्यास त्या सुधारू, गुरुवारी संयुक्त पाहणी करून कोअर काढून घेतो असे आश्वासन दिले. तसेच रस्ते कामाच्या संबंधित सर्व कन्सलटंट यांची शनिवारी बैठक घेण्याचे ठरले.

हेही वाचा…शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; समरजितसिंह घाटगे यांचा इशारा

या बैठकीत सर्व अहवाल सोबत घेऊन यावेत, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा देसाई यांनी दिला. यावेळी उपशहर अभियंता आर के पाटील, शाखा अभियंता सुरेश पाटील, आप शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मयुर भोसले, प्राजक्ता डाफळे, दुष्यंत माने, डॉ. कुमाजी पाटील, रवींद्र राऊत, राजेश खांडके, संजय नलवडे, शुभंकर व्हटकर, रमेश कोळी, अमरसिंह दळवी, गणेश मोरे, दिलीप पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur aap finds errors in rs 100 crore road works pressures municipal officials for accountability psg
Show comments