कोल्हापूर: बँकेमध्ये समाशोधनासाठी भरलेले धनादेश खात्यावर कधी जमा होणार याची प्रतीक्षा करण्याची आता गरज उरणार नाही. ज्या दिवशी धनादेश बँकेत जमा कराल, त्याच दिवशी सायंकाळी रक्कम खात्यात जमा होणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी विश्वजीत करंजकर यांनी ‘दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन’ला ही माहिती दिली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मंगळवारी सांगितले, की देशभरात केवळ आमच्याच संघटनेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे धनादेशाची रक्कम त्याच दिवशी खात्यावर जमा व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच तांत्रिक मुद्द्यांची चर्चादेखील केली होती. या प्रयत्नांना यश आले आहे.
बदल नेमका कोणता?
ज्या दिवशी धनादेश बँकेत भरला जाईल त्याच दिवशी एक तासानंतर संबंधित बँक पुढील बँकेकडे तो धनादेश समाशोधनासाठी पाठवेल. त्यानंतर त्या बँकेवर एका तासाच्या आत तो धनादेश वटवणे किंवा नामंजूर (रिटर्न) करणे बंधनकारक राहील. प्रत्येक तासाला धनादेशाची बॅच समाशोधनासाठी पाठवली जाईल. आणि ते सर्व धनादेश त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता खात्यावर जमा केले जातील. अशा पद्धतीची व्यवस्था येथून पुढे सर्व वित्तीय संस्थांमध्ये सुरू होत आहे.
प्रचलित पद्धत कशी?
सध्या एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस या प्रणालीद्वारे तत्काळ खात्यावर पैसे जमा होतात. परंतु समाशोधनाचे धनादेश जमा केले, की दुसऱ्या दिवशी संबंधित बँक तो समाशोधनासाठी पुढील बँकेस प्रस्तुत करते. तेथून संमती मिळेपर्यंत बँकेचे कामकाज बंद होण्याची वेळ आलेली असते. परिणामी पुढील दिवशी धनादेशाची रक्कम खात्यावर जमा होते. या व्यवस्थेमुळे संबंधित रक्कम तिसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या वापरात येते. नव्या व्यवस्थेमुळे त्याच दिवशी रक्कम जमा होणार आहे.
हेही वाचा – पंढरपूर: चंद्रभागा धोक्याच्या पातळीकडे; पूरसदृश स्थिती कायम
फायदा कोणता?
यामुळे सामान्य ग्राहक, उद्योजक, व्यापारी यांना भांडवलाची उपलब्धता लवकर होणार असल्याने रकमेचा विनियोग लवकर करता येणार आहे. हा बदल झाल्याने केवळ इचलकरंजीत दररोज ७५ ते १०० कोटी रुपये तत्काळ उपलब्ध होणार आहेत. याचा उद्योगवाढीसाठी चांगला फायदा होणार आहे. तसेच, उद्योजकांचे एका दिवसाचे कर्जावरील व्याजदेखील वाचणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.