कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची केएमटी ही बस सेवा ग्रामीण भागात १६ एप्रिलनंतर बंद ठेवावी; अन्यथा हद्दवाढ कृती समितीच्या वतीने ती बंद पाडण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला.
कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी ही मांडणी त्यांच्याकडे करण्यात आली. हद्दवाढ बाबतचा निर्णय शासन घेणार असल्याने तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे प्रशासक मंजू लक्ष्मी यांनी सांगितले. बस सेवा खंडित करण्याबाबत कायदेशीर बाबी पडताळून पाहून निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले.
शहरालगत असलेल्या गावांना बस सेवा पुरवण्यासाठी महापालिकेला दरवर्षी २० कोटी रुपये खर्च करावे लागतात. या सेवेचा लाभ ग्रामीण जनता घेते पण कोल्हापूर शहरात समाविष्ट करण्यास त्यांच्याकडून विरोध केला जातो. त्यामुळे हाच निधी शहरात पायाभूत सुविधांसाठी खर्च केला तर शहराचा विकास अधिक गतीने होईल. असा मुद्दा वकील बाबा इंदुलकर यांनी मांडला. कोल्हापूर महापालिकेची केएमटी ही बस सेवा ग्रामीण भागात १६ एप्रिलनंतर बंद ठेवावी; अन्यथा हद्दवाढ कृती समितीच्या वतीने ती बंद पाडण्यात येईल, असा इशारा या वेळी महापालिका प्रशासनाला देण्यात आला.
शहराची हद्दवाढ तातडीने करा. शहरवासीयांची सहनशीलता संपली आहे. विरोध करणाऱ्या आमदारांसमवेत लवकर बैठक आयोजित करावी, अशी सूचना भाजप प्रदेश सदस्य महेश जाधव यांनी केली. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, अशोक भंडारे, वैशाली महाडिक, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.