कोल्हापुरातील ख्यातनाम उद्योगपती राम मेनन यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांनी स्थापन केलेल्या मेनन अँड मेनन, मेनन पिस्टन, मेनन बेअरिंग्ज या उद्योगांनी आणि त्यातील उत्पादनांची जगभरात नाव कमावले. अमेरिकेतील अँल्कॉप या उद्योग समूहासमवेत त्यांनी मेनन अँल्कॉप ही कंपनी सुरू केली आहे.कोल्हापूरच्या उद्योग विश्वाचा आधारवड कोसळण्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

राम मेनन मूळचे केरळचे. कोल्हापुरात त्यांनी इंजिनिअरिंग उद्योगात नोकरी केली. तत्कालीन उद्योजक बापूसाहेब जाधव, दादासाहेब चौगुले, हेमराज यांच्या संपर्कात ते आले. त्यांनी स्वतःच उद्योग सुरू करण्याचे ठरवले. मेनन पिस्टन हा उद्योग त्यांनी बंधू चंद्रन यांच्या समवेत सुरू केला. अंगभूत हुशारी, चिकाटीच्या जोरावर त्यांनी वाहनांना लागणारे दर्जेदार पिस्टन बनवले. इतके की मारुती सुझुकी मोटार भारतात बनवण्याचे ठरवले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनी राम मेनन यांना मोटारीचे पिस्टन बनवण्यासाठी खास निमंत्रित केले होते.

पिस्टनच्या जोडीने त्यांनी बेअरिंग्ज बनवणारी कंपनी स्थापन करून त्यातही यश मिळवले. अलीकडेच मेनन अँल्कॉप या अमेरिकन कंपनी समवेत त्यांनी भागीदारीत उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या सर्व उद्योगांची उलाढाल कोट्यवधींची आहे. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीचे कामकाज त्यांचे सुपुत्र सचिन मेनन, नितीन मेनन पाहतात.

बडे उद्योजक असतानाही राम मेनन यांची राहणी साधी होती. उद्योजकांशी चर्चा करण्यात ,त्यांना सल्ला देण्यात किंवा अगदी दर शुक्रवारी चित्रपटांचा आस्वाद ते आवडीने घेत असत. कोल्हापूरच्या उद्योगाचे जनाकस्थान असलेल्या कोल्हापूर इंजिनिअरिंग असोशियशनंचे ते अध्यक्ष होते. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

मेनन ग्रुपमधील कंपनीत २५०० कामगार कार्यरत आहेत. या ग्रुपच्या एकूण उत्पादनाच्या ३० टक्के निर्यात ही जगभरातील २४ देशांमध्ये होते. उद्योगासह सामाजिक, क्रीडा, आदी क्षेत्रांत ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी राधामणी, मुले सचिन आणि नितीन, पुतणे विजय, सतीश, मुलगी सविता गोपी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Story img Loader