कोल्हापूर : अडीच वर्षांपूर्वी आत्यंतिक चुरशीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले होते. त्यांनी कोणतीही सल्लामसलत न करता अचानक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे हे अशोभनीय आहे. त्यांच्या विजयासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या आता काय उत्तर देणार, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले.
आमदार जयश्री जाधव यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या मुद्द्यावर पाटील यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, भाजपमधून आलेले चंद्रकांत जाधव आणि त्यांच्या निधनानंतर जयश्री जाधव यांच्या विजयासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतली. तरीही एका रात्रीमध्ये आमदार जाधव यांनी पक्ष का बदलला हे समजू शकले नाही. त्यांच्यावर व्यावसायिक कारणातून काही दबाव होता का, हे मला माहीत नाही. कोल्हापूरची सुज्ञ जनता असला प्रकार खपवून घेत नाही. कोणाच्या जाण्याने कॉंग्रेसच्या यशात फरक पडणार नाही. आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही. महायुतीतील अनेक जण संपर्कात आहेत. ते तिथे बसून त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील.
हेही वाचा : कोल्हापुरात काँग्रेसला धक्का! आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
कॉंग्रेसची उमेदवारी नाकारलेले राजेश लाटकर यांनी बंडखोरी केली आहे. या प्रश्नावर पाटील म्हणाले, राजेश लाटकर यांच्यासोबत चर्चेची एक फेरी झाली असून आणखी एखादी होईल. राष्ट्रसेवा दलात त्यांची जडणघडण झाली असल्याने सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात ते वेगळा कोणताही विचार करणार नाहीत. ते आमच्या सोबत असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात रस्ते झाले का? रस्त्यांची कामे बोगस झाली आहेत, अशी टीका त्यांनी केली.