कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदार महिलांना विनातारण दहा टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येणार आहे, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ लाख ३८ हजार महिलांचे खाते जिल्हा बँकेत आहे. त्यांना बँकेच्या वतीने ३० हजार रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. मासिक ९६८ रुपये त्याचा हप्ता असेल. याशिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत महिलांना ५० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा बँकेने यंदा १० हजार कोटींच्या ठेवींचा टप्पा ओलांडला आहे. बँकेला २५० कोटींचा नफा झाला आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी बँक प्रयत्न करणार आहोत. बँकेला अधिक नफा झाल्यामुळे २८ कोटीचा प्राप्तीकर भरला आहे. पुढील वर्षी १२ हजार कोटींच्या ठेवी जमा करण्याचे तर नफा ३०० कोटी पेक्षा अधिक करणे हे बँकेचे उद्दिष्ट असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील, माजी खासदार निवेदिता माने, संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते.अपघाती विम्याचा लाभयोजनेतील महिलांचे कर्ज प्रस्ताव शाखेत दाखल झाल्यानंतर त्वरीत कर्ज रक्कम खातेवर जमा करण्यात येणार आहे. या योजनेचे सहा महिने पूर्ण झालेनंतर सहभाग महिलांची नांवे व संख्या निश्चित झाल्यानंतर त्यांना २ लाखापर्यत अपघाती विमा योजना सुरु केल जाणार आहे. सदर विमा योजनेचा संपूर्ण हप्ता बँकेमार्फत अदा केला जाणार आहे, असेही अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले