कोल्हापूर : सलग चार मोठ्या महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील गावांना गुरुवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून पाहणी केली. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोणती उपाययोजना केली जात आहे याचा आढाव घेऊन त्यांनी सूचना केल्या. महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. याच्या नियोजनासाठी आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री क्षेत्र गणेशवाडीसह जवळच्या अनेक गावांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली. मागील महापुरामध्ये उद्भवलेल्या परिस्थितींची स्थानिक नागरिक आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोणतीही कसर न ठेवता सर्वच विभागांनी आपापल्या कामांची मायक्रो प्लॅनिंग करा, कुठेही प्रशासन कमी पडणार नाही, अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका प्रशासन संभाव्य महापुरात जनतेच्या सुरक्षिततेसाठी अलर्ट मोडवर असल्याचा धीर त्यांनी नागरिकांना दिला. नागरिकांनी जनावरांच्या सुरक्षिततेसाठी मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना दिल्यात. स्थलांतरित होणारा महत्त्वाचा मुख्य मार्ग तसेच नागरिकांच्या निवाऱ्याची सोय त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापना यंत्रणा कुठे सज्ज ठेवायचे, या सर्व बाबींची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन, इचलकरंजीचे प्रांताधिकारी मोसमी चौगुले, शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर, नरसिंहवाडी मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, महसूल विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती विभाग, आरोग्य, शिक्षण, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आदी विभागाचे अधिकारी तसेच वजीर रेस्क्यू टीमचे रौप पटेल उपस्थित होते.
हेही वाचा – कोल्हापूर: राधानगरी धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू
इचलकरंजीत पाहणी
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या समवेत शहरास भेट देऊन महापुराची झळ बसणाऱ्या शेळके मळा, पंचगंगा नदी घाट या ठिकाणची पाहणी केली.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीची सविस्तर माहिती आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी दिली. यामध्ये यांत्रिक बोट, साधी फायबर बोट, स्टिल कटर, वुड कटर, लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर, टॉर्च, स्लायडिंग शिडी, बायनाक्युलर ईत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्ण वाहिका, हायड्रोलिक प्लॅटफार्म, औषध फवारणी ट्रॅक्टर, सक्शन ट्रॅक्टर याचा समावेश आहे.
हेही वाचा – अखेर इचलकरंजीतील अतिक्रमणांवर हातोडा; मोहीम कठोरपणे राबवण्याची मागणी
सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असले बाबतची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेवून महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास सदर परिस्थिती यशस्वीपणे हाताळण्यासाठी त्याचे अचूक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, सहा आयुक्त केतन गुजर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, आदी अधिकारी उपस्थित होते.