कोल्हापूर : मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने अवघा कोल्हापूर जिल्हा शनिवारी चिंब झाला. जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून काही भागात अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीकडे जाऊ लागली आहे. आषाढातील पाऊस म्हणजे काय याची अनुभूती आता कोल्हापूर जिल्हा घेऊ लागला आहे. सततच्या पर्जन्यवृष्टीमध्ये पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, ताम्रपर्णी अशा सर्व नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
नद्यांना पूर
पंचगंगा नदीची पाणी पातळी सायंकाळी चार वाजता ३६ फूट २ होती. तर ३९ फूट ही इशारा पातळी आहे. ६९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोगे पुलावर पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. दूधगंगा नदीला पूर आल्याने कर्नाटककडे जाणाऱ्या राधानगरी – निपाणी राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लोखंडी कठडे लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
हेही वाचा – कोल्हापूर : दंगलग्रस्त गजापूर, मुसलमानवाडीत तातडीची मदत वाटप सुरु
हेही वाचा – कोल्हापुरात पंचगंगा नदी पुन्हा इशारा पातळीच्या दिशेने; ७२ बंधारे पाण्याखाली
प्रशासन सतर्क
दरम्यान, संभाव्य पूरस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. स्वयंसेवक आणि एनडीआरएफची पथके सज्ज ठेवावीत, पूर निर्माण झाल्यास नागरिक आणि जनावरांचे स्थलांतर वेळेत करावे, पुराचे पाणी आलेले रस्ते बंद करावेत असा सूचना त्यांनी केल्या आहेत. तर इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली.