कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यामुळे ही मूर्ती बदलण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने उपजिल्हाधिकारी संपत खिलारे यांच्याकडे शुक्रवारी करण्यात आली.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी आहे. होय. देवीच्या दर्शनासाठी देशासह परदेशातून दररोज हजारो भावीक येत असतात. दैनंदिन पूजा, अर्चा आणि अभिषेक यामुळे देवीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. या मूर्तीवर बऱ्याच वेळा रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आल्याने मूर्तीच्या काही भागाची बऱ्याच प्रमाणात झीज झाली असून मूर्तीचे मूळ रूप बदलले आहे.

आणखी वाचा-टोमॅटो दरात वाढ, उत्पादक शेतकऱ्यांचे चेहरे फुलले

याबाबत पुरातत्व खात्यानेही अहवालात गंभीर मुद्दे नमूद केले आहेत. ही स्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनानं श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती बदलून या ठिकाणी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष सरदार जाधव, अशोकराव जाधव, अनिल पाटील, लता सोमवंशी, शालिनी सरनाईक आदींनी केली आहे.