दहावीचा निकाल सोमवारी जाहीर होताना कोल्हापूर विभागाने राज्यात सलग चौथ्यावर्षी दुसरा क्रमांक पटकावित शैक्षणिक क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा १.२३ टक्क्यांनी निकालात घट झाली. यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.९१ टक्के इतकी असून मुलांच्या तुलनेत २.४१ टक्क्यांनी अधिक आहे. जिल्ह्यातील २ हजार १९३ शाळांपकी ६३८ शाळांचे निकाल १०० टक्के असून ९० ते ९९.९९ टक्क्यादरम्यान असणाऱ्या शाळांची संख्या १ हजार ६४ आहे.

महाराष्ट्राच्या राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १ मार्च ते २९ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. यामध्ये राज्यातून १७ लाख २७ हजार ४६ विद्यार्थी बसले होते, तर कोल्हापूर विभागात १ लाख ५० हजार ८४३ विद्यार्थी बसले होते.

यंदाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये ८ लाख ४२ हजार मुले होती. यापकी ७४ हजार २८३ मुले उत्तीर्ण झाली असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.८१ टक्के इतके आहे. तर ६४ हजार ९६५ मुली प्रविष्ठ झाल्या होत्या, त्यापकी ६१ हजार ८५९ मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २.४१ टक्के इतके अधिक आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली.

५७ जणांना कॉपी भोवली 

मार्च २०१६ परीक्षेत सातारा जिल्ह्यात २०, सांगली ५ तर कोल्हापूर ३२ असे एकूण ५७ कॉपी प्रकरणे उघडकीस आली आहेत. चौकशीअंती विद्यार्थी दोषी आढळल्याने त्यांना मार्च २०१६ ची परीक्षेची संपूर्ण संपादणूक रद्द आणि पुढील एक परीक्षा म्हणजेच जुल २०१६ परीक्षेस प्रतिबंध अशी शिक्षा करण्यात आली आहे.

९ वी, ११ वीच्या प्रश्नपत्रिका महामंडळाकडून

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होण्यासाठी ९ वी व ११ वीच्या प्रश्नपत्रिका शिक्षण मंडळाकडून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत सचिव स्तरावर चर्चा सुरु असून २०१७ सालच्या शैक्षणिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी सांगितले.

Story img Loader