कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाचा कल पाहता भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बेछूट आरोप चालवले आहेत. मोदी यांच्या मनात निर्माण झालेली ही भीती आहे, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील उपस्थित होते.
शरद पवार यांचा आत्मा भटकत आहे, अशा पद्धतीची चुकीची टीका नरेंद्र मोदींनी चालवली आहे. यातून महाराष्ट्राला अपमानित करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा असे विधान मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला हे शोभा देणारे नाही. देशातील लोक जातीयता वाढू नये अशा विचाराचे असताना मोदी मात्र त्याला खतपाणी घालत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसल्याने निवडणुकीला मुस्लिम लीगच्या जाहीरनामा असे वळण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
हेही वाचा – चेतन नरकेंचं ठरलं; शाहू महाराजांना पाठिंबा, प्रचाराला सुरुवात
दक्षिणेत वेगळा देश निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असाही खोटा प्रचार मोदी यांनी चालवलेला आहे. मुळात अशा पद्धतीची मागणी कोणीही केलेली नाही. परंतु दक्षिणेतील राज्यात भाजपचा टिकाऊ लागणार नाही म्हणून ते अशी चुकीचे विधाने करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन्ही टप्प्याचे निकाल पाहता भाजपचा पराभव अटळ आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत येईल असे चित्र दिसत आहे. यामुळे मोदी हे भयग्रस्त झाले असून ते काँग्रेसवर बेछूट आरोप करत सुटले आहेत, अशी टीका त्यांनी केली.